गेल्या काही दिवसातील बातम्या पाहिल्या तर असे दिसेल की अगदी भारताच्या राजधानीत म्हणजे दिल्लीतही हवेचे प्रदूषण प्रचंड वाढले आहे. इतर काही ठिकाणीही अशीच कठीण परिस्थिती निर्माण झाली असली तरी हे हवेचे प्रदूषण आता आपल्याला सहनच करावे लागणार आहे. त्यावर त्वरित कार्यवाही करून ते थांबवणे अवघड आहे.
हवेच्या प्रदूषणावर उपाय करण्याचे प्रयत्न सुरु असले तरी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात हे प्रदूषण नुसते सुरु रहात नाही तर ते वाढतेच आहे. अशा धूर, धुके आणि सूक्ष्म कणांच्या प्रदूषित हवेतील श्वासामुळे मानवी शरीराच्या प्रत्येक भागावर विपरीत परिणाम होतो आहे. पूर्वी फार मोठ्या शहरातच टोलेजंग अशा बहुमजले इमारती असायच्या. आज त्या प्रत्येक शहरात दिसताहेत आणि त्यांच्यासोबत दिसतेय ते शहरावरचे प्रदूषण आच्छादन…
जगातील प्रत्येक देशात आज शुध्द हवेचा कायदा आहेच असे म्हणता येईल. परंतु त्यासाठी शहरातील विविध जागी प्रदूषण आकड्यांचे फलक लावून नागरिकांची प्रकृती सांभाळता येणार नाही. त्यासाठी मानवी शरीरावर प्रदूषण कसे परिणाम करते हे समजावून घ्यावे लागेल. आपण हवेतून श्वास घेत असल्यामुळे आणि तो फुफ्फुसांमध्ये जात असल्यामुळे सर्वात अगोदर श्वास नलिका आणि त्या संदर्भातील अवयवांवर विपरीत परिणाम होतो. आपण ज्या हवेत श्वास घेतो त्या हवेत काय काय असते याची माहिती घेणे आवश्यक आहे हवेतील सूक्ष्म कण हे कर्करोगाचेही कारण बनू शकते असे आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्थेने म्हटले आहे.
विविध प्रकारचे फुफ्फुसांचे रोग,खोकला. श्वासोच्छवासाला अडथळा होणे, दमा, न्युमोनिया आणि मुलांमध्ये फुफ्फुसांची योग्य रीतींने वाढ न होणे अशा घटना होऊ शकतात. प्रदूषणातील घटक रक्त वाहिन्यांमध्ये गेल्यामुळे होणारे रोग, हृदयाचे ठोके अनियमित होणे असे विकारही होऊ शकतात. आपल्या भारताचाच विचार करायचा तर २०२२च्या आकडेवारीनुसार हवेतील सूक्ष्म कण त्यावर्षी १७ ते २० लाख लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरले होते आणि हा आकडा त्याआधीच्या काही वर्षात ३० टक्के वाढला होता. लॅन्सेट या विज्ञान नियतकालिकानुसार यामुळे ४४ टक्के मृत्यू हे कोळसा. डीझेल आणि पेट्रोल इंधन आणि वाहने यांच्यामुळे झाले होते आणि भारताच्या सकल देशांतर्गत उत्पन्नाच्या (जीडीपी) ९.५ टक्के हानी झाली होती. याचाच अर्थ दररोज ४,६५७ माणसाचे मृत्यू हवेच्या प्रदूषणामुळे असतात. कोळशावर आधारित विद्युत निर्मिती केंद्रे देखील हवेच्या प्रदूषणाला कारणीभूत असतात. पण एक चांगली बातमी अशी की एका प्रगत देशात असे दिसून आले की अशी कोळशावर आधारित केंद्रे जेव्हा बंद केली गेली तेव्हा अपुऱ्या दिवसात जन्मलेल्या बालकांची संख्या कमी झाली होती. ठरवायचे आपणच आहे…
प्रसन्न फीचर्स

श्याम तारे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *