अजितदादांच्या निधनाने कबड्डी खेळाचे मोठे नुकसान–रामशेठ ठाकूर
पनवेल : मातीतल्या खेळांपैकी एक असलेल्या कबड्डी खेळाचा आधारस्तंभ असलेले अजितदादा पवार यांच्या निधनामुळे खेळाचे मोठे नुकसान झाले आहे, असे भावूक प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, पनवेल आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने “रायगड जिल्हास्तरीय प्रौढ महिला व पुरुष गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने रायगड जिल्हा कबड्डी पंच शिबिराचे आयोजन पनवेल येथील मार्केट यार्डमधील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे माजी सरकार्यवाह अॅड. आस्वाद पाटील, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या प्रमुख कार्यवाह डॉ. चित्राताई पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रसाद भोईर, प्रमुख मार्गदर्शक जे. जे. पाटील, जगदीश पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेते सूर्यकांत ठाकूर, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक शरद कदम, सुमित माने, नरेश म्हात्रे, जनार्दन पाटील, पनवेलचे क्रीडा प्रमुख व्ही. बी. नाईक, पंच मंडळाचे सचिव अॅड. अजिंक्य पाटील, कार्यालयीन प्रमुख अनिल कोळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पंचांना मार्गदर्शन करताना रामशेठ ठाकूर म्हणाले की, स्वर्गीय अजितदादा हे क्रीडा क्षेत्रातील आधारस्तंभ होते. कबड्डी खेळाच्या विकासासाठी त्यांनी मोठे योगदान दिले असून खेळाडूंना ५ टक्के नोकरी आरक्षण मिळवून देण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. पनवेलमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या अनेक स्पर्धांना त्यांची प्रमुख उपस्थिती लाभायची. महाराष्ट्र ऑलिंपिक कबड्डी संघटनेचे अध्यक्षपद भूषविलेल्या अजितदादा यांच्या निधनाबद्दल त्यांनी दुःख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.तसेच दि. २० ते २२ दरम्यान होणाऱ्या रायगड जिल्हा निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी सर्वांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करत शिबिराला शुभेच्छा दिल्या. यावेळी राज्य कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाह अॅड. आस्वाद पाटील यांनी पंचांच्या अडचणी व तक्रारी जाणून घेत मार्गदर्शन केले. पंचांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे समाधानकारक निरसन करत संघटना पंचांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हे शिबिर सकाळ व दुपार अशा दोन सत्रांत पार पडले.
