अडिवली येथील ऑस्टिन नगर रस्ता व रस्तालगत गटर बनविण्याची मागणी
आई एकविरा महिला मंडळाचे केडीएमसी महापौरांना पत्र
कल्याण : कल्याण पूर्वेतील मलंगरोडवरील अडिवली येथील ऑस्टिन नगर रस्ता व रस्तालगत गटर बनविण्याची, स्ट्रीट लाईट लावण्याची मागणी करण्यात आली असून याबाबत आई एकविरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सोनी क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर यांनी केडीएमसी महापौर हर्षाली चौधरी यांची भेटून पत्र दिले आहे.
गेल्या ६ ते ७ वर्षापासून अडिवली परिसरातील ऑस्टिन नगर, अंजनाबाई गॉर्डन, येथील रस्ता व रस्त्यालगत गटार बनविण्याकरिता व स्ट्रीट लाईट लावण्याकरिता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त व शहरअभियंता तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे आई एकविरा महिला मंडळ वारंवार पत्राद्वारे पाठपुरवा करित आहे. मंडळाच्या वतीने पाठपुरावा करीत असताना वारंवार आयुक्त व शहर अभियंता यांच्याकडून निधीची कमतरता असल्याचे त्यांच्याकडून उत्तर येत असून ऑस्टिन नगर, अंजनाबाई गॉर्डन, अडिवली येथील रस्त्याची अवस्था खूपच बिकट झालेली आहे.
मंडळाच्या वतीने दोन वेळा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर निषेध व श्राध्द आंदोलन केले आहे. त्यामुळे या विभागाची पाहणी करुन तातडीने रस्ता व रस्त्यालगत गटार बनविण्याकरिता व स्ट्रीट लाईट लावण्याकरिता निधी उपलब्ध करण्याची मागणी आई एकविरा महिला मंडळाच्या वतीने महापौरांकडे करण्यात आली आहे.
