अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’आंतरराष्ट्रीय व्यावसाय परिषदेत डॉ.सुनील खर्डीकर सन्मानित

कल्याण : विदर्भाला जागतिक गुंतवणुकीचा ‘हब’ बनवण्याच्या उद्देशाने आयोजित ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ २०२६’ या आंतरराष्ट्रीय व्यवसाय परिषद नागपूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात उद्योग जगताने विदर्भावर विश्वास दाखवत लाखो कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत. आयोजित परिषदेला डोंबिवलीतील खर्डीकर क्लासेसचे संचालक अध्यक्ष तसेच प्रसिद्ध व्यवसायिक डॉ.सुनील खर्डीकर हे देखील उपस्थित राहिले होते. व्यावसायिक क्षेत्रातील यशस्वी कारकिर्दीबाबत त्यांना चीन देशाचे प्रतिनिधी कीन जाय यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले.

आयोजित परिषदेत प्रामुख्याने अदानी समूहाने ७०,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यासोबतच, महिंद्रा अँड महिंद्रा समूहाने १५,००० कोटी रुपयांचा प्रकल्प नागपुरात उभारण्याचे निश्चित केले आहे. या गुंतवणुकीमुळे विदर्भातील ऑटोमोबाईल, सौर ऊर्जा आणि लॉजिस्टिक क्षेत्राला मोठी उभारी मिळणार आहे. “विदर्भ आता केवळ कृषीप्रधान प्रदेश राहिला नसून तो उद्योगांचे पॉवर हाऊस बनत आहे. या परिषदेतून होणाऱ्या गुंतवणुकीमुळे पुढील ५ वर्षांत सुमारे ५ लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील, ज्यामुळे स्थानिक तरुणांचे स्थलांतर थांबेल.” अशा भावना यावेळी डॉ.सुनील खर्डीकर यांनी व्यक्त केल्या.

या तीन दिवसीय परिषदेत रशिया, चीन, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकन देशांसह एकूण २३ देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. ३५० हून अधिक स्टॉल्सच्या माध्यमातून विदर्भातील स्टार्टअप्स आणि मध्यम उद्योजकांना आपली उत्पादने जागतिक व्यासपीठावर मांडण्याची संधी मिळाली आहे. डॉ.सुनील खर्डीकर यांनीही इतर व्यावसायिकांच्या भेटीगाठी घेत विचारांचे आदान प्रदान केले.

नागपुरात झालेल्या या आंतरराष्ट्रीय व्यावसायिक परिषदेत विविध देशांतील प्रतिनिधीं समवेत हितगुज करता आले. व्यवसायातील बारकावे, करावयाच्या गोष्टी याबाबत इतर व्यवसायिकां समवेत चर्चा करता आली. भारतातील उद्योग व परदेशातील उद्योग यातील तफावतीची प्रकर्षाने जाणीव झाली. आज भारतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असेल तर भविष्यात नक्कीच रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध होतील असा विश्वास डॉ.सुनील खर्डीकर यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *