काल समाजमाध्यमावर पत्रकारांच्या एका समूहात एका पत्र परिषदेचे निमंत्रण प्रसारित केले होते. त्यात कोणाची आणि कोणत्या विषयावर पत्र परिषद हे तर नमूद केले होतेच, पण शेवटी पत्र परिषद संपल्यावर सर्वांना चहा आणि नाश्ता देण्यात येईल तसेच भेटवस्तू देखील देण्यात येतील असे देखील लिहिले होते. त्यावरून मग त्या समूहात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते.
याचाच अर्थ पत्रकारांना चहा नाश्ता आणि महागड्या भेटवस्तू दिल्या तरच ते तुमच्या संबंधीच्या चांगल्या बातम्या प्रसारित करतील असाच घेतला जाईल. पत्रकारांना अशी लालूच दाखवून त्यांच्याकडून आपल्या सोयीच्या बातम्या प्रसारित करवून घेणे हे योग्य की अयोग्य यावर नेहमीच चर्चा होत असते. मात्र हे प्रकार आज नियमित चालू आहेत, हे वास्तव देखील नाकारता येणार नाही.
मराठी पत्रकारितेचा इतिहास बघितल्यास अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी पत्रकारिता हा वसा म्हणून स्वीकारला होता, आणि त्यासाठी ते अखेरपर्यंत झिजले असे दिसून येते. त्या काळात वर्तमानपत्र चालवणे हे एक दिव्य असायचे, सतीचे वाणच असायचे. लोकमान्य टिळक स्वतः केसरीचे अंक घरोघरी वाटायला जात असत. इतरही तत्कालीन पत्रकारांची अवस्था काही फारशी वेगळी नव्हती. अनेक पत्रकार तर दिवसभर दुसरा काहीतरी पोटासाठी उद्योग करायचे आणि संध्याकाळी वृत्तपत्राच्या कार्यालयात जाऊन काम करायचे. तिथे त्यांची निष्ठा ही बातमीशी असायची. कोणत्याही परिस्थितीत खरी बातमी ही वाचकांपर्यंत जायला हवी ही त्यात धडपड असायची. मग अगदी सख्खा भाऊ जरी चुकला असेल तरी त्याच्याविरुद्ध पत्रकार बातमी लिहायला तयार असायचे. त्यामुळे पत्रकारांजवळ भलेही पैसा नसेल पण त्यांचा समाजात एक दबदबा असायचा. त्यांना समाजात सन्मान मिळत असे.
त्या काळात वृत्तपत्रे ही संपादकांच्या नावावर चालत असत. हे संपादक आपल्या विचारधारेशी एकनिष्ठ असायचे. जाहिरातीसाठी किंवा कोणी लालूच दाखवली म्हणून ते बातमीशी तडजोड कधीच करत नसत.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशात लोकशाही व्यवस्था प्रस्थापित झाली. त्यामुळे दर पाच वर्षांनी निवडणूकांना सामोरे जाणे ही गरज बनली. मग राजकारणी लोकांनी आपली वृत्तपत्रे सुरू केली. अनेक राजकारण्यांनी चालू असलेली वृत्तपत्रे विकत घेतली. अगदी नाव घेऊन सांगायचे तर स्वातंत्र्य सेनानी लोकनायक बापूजी अणे यांचे लोकमत जवाहरलाल दगडांनी चालवायला घेतले. नामदार गोपाळ कृष्ण गोखलेंनी सुरू केलेले दैनिक हितवाद बनवारीलाल पुरोहित यांनी चालवायला घेतले. तर नानासाहेब परुळेकर यांचे सकाळ शरद पवारांनी चालवायला घेतले. अशी अनेक वृत्तपत्रे वेगवेगळ्या राजकारण्यांच्या मालकीची बनली. तर काही राजकारण्यांनी स्वतःचीच वृत्तपत्रे सुरू केली. त्याच सोबत काही उद्योगपतींनी देखील उद्योगातला काळा पैसा पांढरा करण्यासाठी आपली वृत्तपत्रे सुरु केली. मग तिथे संपादक हा पगारी माणूस असायचा. त्याला मालक सांगेल तेच लिहावे लागायचे. मग त्याची बातमीशी असलेली निष्ठा ही हळूहळू कमी होऊ लागली. वृत्तपत्रे ही कोणाची तरी भाईगिरी तर करत नाही ना असे वाटू लागले.
याच काळात मग पत्रकारांना अशी आमिषे देणे सुरू झाले. जेव्हापासून राजकारणी आणि उद्योगपती हे अशा पत्र परिषदा घेऊ लागले, तेव्हापासून हे प्रकार जास्त वाढीला लागले. सकाळी नऊची पत्र परिषद म्हणजे नाश्ता हा आलाच, आणि दुपारी बाराची पत्र परिषद म्हणजे जेवण देणे हे बंधनकारक झाले असायचे. रात्रीच्या जेवणात अनेकदा ओल्या पार्ट्या सुद्धा दिल्या जायच्या. इथेच मग महागड्या भेटवस्तू देणे देखील सुरू झाले. मला आठवते एकदा एका कृषी उत्पादने करणाऱ्या कंपनीची पत्र परिषद होती. त्यांनी आपल्या उत्पादनाची माहिती देताना ओलिताची शेती आणि कोरडवाहू शेती याबाबत विस्तृत विवेचन केले. मात्र त्यांनी भोजनापूर्वी ओल्या पार्टीची व्यवस्था काहीच ठेवली नव्हती. त्यामुळे एक ओल्या बैठकीतले पट्टीचे पत्रकार लगेचच बोलून गेले, अरे ही तर कोरडवाहू शेती आहे, ही काय कामाची? कशाला यांची बातमी द्यायची?
राजकारण्यांनी आणि औद्योगिक घराण्यांनी लावलेल्या सवयींमुळेच पत्रकारांची हळूहळू अशी मानसिकता बनू लागली होती. मात्र त्या काळात पत्र परिषद संपल्यावर भोजन आहे आणि भेटवस्तू दिले जाणार आहे अशी लालूच दाखवायची गरज पडत नव्हती. जाणारे पत्रकार बातमीसाठी जात असत. भेटवस्तू ही त्यांच्यासाठी दुय्यम असायची.
हळूहळू परिस्थिती बदलू लागली. मग पत्रकार फक्त भेटवस्तूवरच थांबत नव्हते. तर इतरही सोयी सवलती मागत होते. अनेक पत्रकार मग राजकारण्यांना उन्हाळ्यात कुटुंबाबरोबर प्रवासाला जायचे म्हणून कुठेतरी हिल स्टेशनला सोय करून मागायचे. त्याशिवाय विमानाचे भाडे सुद्धा मागायचे. नाहीच काही, तर एसी टू टायरचे तरी तिकीट काढून मागायचे. अनेकदा पत्रकारांनी मागितले नाही तरी राजकारणीच स्वतःहून पुढे यायचे आणि या सर्व सोयी करून द्यायचे. त्यामुळे मग पत्रकारांच्या सवयी बिघडत गेल्या आणि त्यांच्या अपेक्षा देखील वाढत गेल्या. भेटवस्तू मिळाली नाही किंवा मागण्या पूर्ण झाल्या नाही, तर बातमीमूल्य असलेली बातमी देखील दाबून ठेवली जाऊ लागली. ही परिस्थिती हळूहळू वाढू लागली.
आज इंटरनेटचा जमाना आहे. माहितीचा प्रस्फोट होतो आहे. त्यामुळे अनेक पत्रकार घरी बसूनच पत्रकारिता करू लागले आहेत. अशावेळी मग त्यांना आपल्याकडे आकर्षित करायचे तर कंपन्यांना पत्रकारांना अशी आमिषे दाखवणे गरजेचे झाले आहे. तरच ते तुमच्या बातम्या देतील अन्यथा देणार नाहीत हे वास्तव आता नाकारता येणार नाही.
अजून काही वर्षांनी कदाचित ही परिस्थिती देखील बदलेल. मग कंपन्यांच्या जनसंपर्क विभागातील कर्मचाऱ्यांना प्रत्येक पत्रकाराकडे बातमी आणि भेटवस्तू घेऊनच पुढे जावे लागेल. तरच बातमी येण्याची शक्यता राहील. अन्यथा मग तुमची बातमी पेंडिंगच ठेवली जाईल.
मात्र ही खरी पत्रकारिता असेल का याचाही आता विचार करायला हवा. ही पत्रकारिता न राहता जर निव्वळ भाटगिरी होऊ लागली तर वाचकांना खऱ्या बातम्या मिळणार तरी कशा आणि त्यांची बातम्यांची भूक भागणार तरी कशी हादेखील विचार करायलाच हवा, इतकच सहज सुचलं म्हणून सांगावसं वाटते.
अविनाश पाठक
