भारतातील रुग्णांसाठी जागतिक उपक्रमाचे उद्घाटन
रमेश औताडे
मुंबई : हृदयविकार आणि नसांशी संबंधित आजारांसाठी एकाच गोळीमध्ये अनेक औषधांचे मिश्रण असलेले उपचार आता भारतात होणार आहेत. फ्रान्समधील औषध निर्मिती कंपनी सर्वियर ने भारतात ‘ गॅटिन ‘ नावाचा एक जागतिक दर्जाचा उपक्रम सुरू करणार आहे.
बऱ्याचदा गंभीर आजारांमध्ये रुग्णांना दिवसभरात अनेक वेगवेगळ्या गोळ्या घ्याव्या लागतात. यामुळे औषधे घेण्याचा कंटाळा येतो. “ एक गोळी, अनेक औषधे “ यामुळे रुग्णांना दररोज अनेक गोळ्या घेण्याऐवजी फक्त एकच गोळी घ्यावी लागेल. गॅटिनचे मुख्य ऑफिसर डॉ. क्षितिज पानसे म्हणाले की, आम्ही भारतातील तज्ज्ञ आणि सर्वियरचे जागतिक कौशल्य एकत्र करून रुग्णांना उच्च दर्जाची औषधे कमी वेळात उपलब्ध करून देणार आहोत.
कार्यकारी उपाध्यक्ष शार्लेट मार्मोसेझ यांनी सांगितले की, रुग्णांचे आरोग्य सुधारण्यासाठी भारतात हा पहिलाच जागतिक प्लॅटफॉर्म सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात तब्बल १३५ कोटी रुपये ही कंपनी गुंतवणार आहे. ही औषधे भारतात तयार करून आशिया, लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि मध्यपूर्वेतील देशांमध्ये निर्यात केली जातील.
