किन्हवली पोलिसांना कोणी घर देत का घर
पोलिसांच्या निवासस्थांनाची दैन्यावस्था भिंतीची पडझड, छप्पर कोसळलेले,मोडके दरवाजे,खिडक्या तुटलेल्या
अविनाश उबाळे
ठाणे : ठाणे ग्रामीण पोलिसांच्या किन्हवली पोलिसांच्या शासकीय निवासस्थांनाची प्रचंड अशी दुरावस्था झाल्याचे वास्तव समोर येत आहे.जीर्ण झालेले भितींचे बांधकाम दरवाजे तुटलेले,खिडक्या मोडकळीस आलेल्या छप्पर कोसळलेले रात्रंदिवस विषारी साप,उंदीर घुशींचा वावर गवत,झाडी, झुडपांचा विळखा असे भयानक चित्र येथे पाहावयास मिळत आहे.राज्य सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे देखभाल दुरुस्ती अभावी पोलिसांच्या निवास्थांची प्रचंड दैन्यवस्था झाली आहे.त्या पोलीस निवासी चाळी पुर्णतः कोसळेलेल्या स्थितीत दिसत आहेत.एकिकडे पोलीसांच्या निवासी चाळींची दैन्यावस्था झाली असताना दुसरीकडे १८६२ साली बांधण्यात आलेल्या या ब्रिटिशकालीन असलेल्या किन्हवली पोलीस ठाण्याच्या इमारतीची लाखो रुपये खर्च करून सध्या डागडुजी,रंगरंगोटी व दुरुस्ती व नुतनीकरणाची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू आहेत.तर दुसरीकडे येथे नवीन पोलीस ठाण्याची इमारत तसेच पोलिसांची निवासस्थानं बांधण्याच्या प्रस्तावास शासनाकडून निधी उपलब्ध न झाल्याने जुन्याच पोलीस ठाण्याच्या इमारतीची डागडुजी व दुरुस्तीची कामे केली जात आहेत.येथील पोलीस ठाण्याच्या जागेवर नवीन
इमारत व पोलीसांसाठी सुसज्ज अशी निवासस्थानं बांधण्याचा जवळपास साडेपाच कोटींचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्यात आला आहे.मात्र या प्रस्तावाला अद्यापही मान्यता न मिळाल्याने पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीचा प्रश्न प्रलंबित आहे असे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार यांनी सांगितले नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव रखडल्याने किन्हवलीतील पोलिसांच्या निवासस्थांनाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.सण असोत की उत्सव लोकांच्या सुरक्षेची काळजी घेत चौवीस तास आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणाऱ्या ठाणे ग्रामीण पोलीसांच्या किन्हवली पोलिसांच्या घराचा प्रश्न मात्र गंभीर बनला आहे.
याकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आता लक्ष देण्याची गरज आहे.पोलीस कर्मचाऱ्यांना राहायला घरच नाहीत तर आहेत ती घरं कोसळून पार उद्ध्वस्त झाली आहेत.पोलीस निवासी चाळींची ही दैन्यवस्था पाहता अनेक पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांवर आता घरं भाड्याने घेऊन राहण्याची वेळ आली आहे.किन्हवलीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक हे देखील भाड्याने घर घेऊन राहत आहेत.किन्हवली पोलीस ठाण्यात एकूण ४० पोलीस कर्मचारी आपलं कर्तव्य बजावत असून त्यांच्यावर ९३ गावं व ४७ ग्रामपंचायती यांची कायदा आणी सुव्यवस्था राखण्याची महत्त्वाची जबाबदारी आहे.
किन्हवली पोलीस ठाण्याचे नुतनीकरणाचे काम येथे केले जात असले तरी येथील जागेवर नवीन पोलीस ठाण्याच्या पक्या इमारतीचे बांधकाम करणे व येथे पोलीस कर्मचारी यांच्यासाठी निवासस्थाने बांधणे अत्यंत गरजेचे आहे.मात्र केवळ पोलीस ठाण्याची डागडुजी,रंगरंगोटी व नुतनीकरणाच्या कामासाठी लाखो रुपयांची ही सरकारी उधळपट्टी करण्यात येत आहे.अशी एकंदरीत परिस्थिती दिसून येत आहे.येथे नवीन पोलीस ठाण्याची इमारत व पोलीसांसाठी घरं बांधणे ही अनेक वर्षांची मागणी असताना केवळ स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे व सरकारच्या लाल फितीच्या कारभारामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या हक्काचे सरकारी घराचे स्वप्न हे मात्र अपूर्ण राहिले आहे.
