टिपू सुलतानवरून पुण्यात भाजपा-काँग्रेसचा राडा

दगडफेकीत एकमेकांची डोकी फोडली

पुणे : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर तुलना करणारे वक्तव्य केल्यानंतर राज्यभर भाजपाने जोरदार निदर्शने केली. पुण्यात तर भाजपाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या कार्यालयावर चालून आले. यावेळी झालेल्या झटापटीत कार्यकर्त्यांनी एकमेकांची डोकी फोडली.  हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी जोरदार निषेध केला होता. त्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पुणे काँग्रेस भवनाच्या बाहेर आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आंदोलनावेळी दगडफेक आणि बाटल्या फेकल्याचा आरोप काँग्रेसने केला असून यामध्ये काही कारच्या काचा फुटल्या, तसेच गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यांला दगड लागल्याने तो रक्तबंबाळ झाला. तर दगडफेक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून झाल्याचा भाजपा कार्यकर्त्यांनी केला. दरम्यान, भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आल्यामुळे पुण्यात काही वेळ मोठा गोंधळ आणि तणाव निर्माण झाला होता. मात्र, त्यानंतर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. दरम्यान, भाजपाच्या पोस्टरबाजीविरोधात काँग्रेसने भाजपा नेते आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचे महाराजांबाबतेच वादग्रस्त वक्तव्य असलेले पोस्टर झळकावले होते.

“आजचा दिवस हा एकदम वाईट दिवस आहे, कारण पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला”, असं प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे.

हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले ?

हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं की, “छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्यांच्या शौर्याप्रमाणेच, त्याच मांदियाळीत टिपू सुलतान आहेत. टिपू सुलतान यांनी इंग्रजांविरोधात लढा पुकारला होता. टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे एक योद्धे होते. ते भारताचे भूमिपूत्र होते. त्यांनी कधीही विषारी, विखारी विचारांना जवळ केलं नाही. ते एक शौर्याचं लक्षण म्हणून आपण टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे”, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *