ठाण्यातील मालवणी महोत्सवात ‘डबलबारी’ भजनाची रंगत
बुवा संतोष जोईल विरुद्ध श्रीकांत शिरसाट यांच्यात रंगला सुरेल सामना
अनिल ठाणेकर
ठाणे,शिवाई नगर येथील उन्नती गार्डन मैदानात कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीने आणि आयोजक नगरसेवक सीताराम राणे यांच्या पुढाकाराने स्व. अजितदादा पवार महोत्सव नगरीत भव्य मालवणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा महोत्सवाचे २७ वे वर्ष असून, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
महोत्सवात शनिवारी कोकणातील भजनी बुवा संतोष जोईल आणि बुवा श्रीकांत शिरसाट यांच्यात रंगलेल्या ‘डबलबारी’ भजनाने रसिकांची मने जिंकली. जोईल बुवांनी प्रारंभी “जय जय रामकृष्ण हरी”चा गजर करत महाराष्ट्र गीत सादर केले. त्यांच्या सादरीकरणातून राष्ट्रप्रेमाची भावना जागृत झाली आणि उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. प्रत्युत्तरात शिरसाट बुवांनी माता-पित्यांच्या महतीचे वर्णन करणारे भावस्पर्शी भजन सादर केले. डबलबारीच्या या लढाईला एका आजीबाई व नातीने पुरस्काररूपी रोख पारितोषिक दिले. तोच धागा पकडून शिरसाट बुवांनी प्रतिस्पर्धी जोईल बुवांना “माय माऊलीचा विसर” पडल्याचा टोला लगावत रंगत वाढवली. या सुरेल आणि शब्दबाणांनी सजलेल्या डबलबारीच्या जंगी सामन्याला प्रेक्षकांकडून टाळ्यांचा कडकडाटात प्रतिसाद मिळाला.दरम्यान, मालवणी महोत्सवाला राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष मा. मंत्री महादेव जानकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, “नोकरदार बनण्यापेक्षा उद्योगी बना, नोकरी देणारे बना,” असा संदेश दिला. गेली २७ वर्षे आयोजक नगरसेवक सीताराम राणे हेच विचार समाजापर्यंत पोहोचवत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, त्यांच्या कार्यतत्परतेला पाठबळ देत भविष्यात राणे यांना आमदार बनवून मंत्रीपदी पोहोचवावे, असे आवाहनही त्यांनी जनसमुदायाला केले. खाद्य संस्कृतीसह सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपत सामाजिक संदेश देणारा शिवाई नगरचा हा मालवणी महोत्सव ठाणेकरांसाठी पर्वणी ठरत असून, ‘डबलबारी’ भजनाचा सुरेल सामना यंदाच्या उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरले आहे.
