डोंबिवलीत बेसमेंट पार्किंगमध्ये आग
२९ दुचाकी जळून खाक
पाच जण जखमी
डोंबिवली : डोंबिवली पूर्वेयेथील चेडा नगरातील रविकिरण सोसायटीतील राज अपार्टमेंट, जय भारत स्कूलजवळील बेसमेंट पार्किंगमध्ये पहाटे सुमारे सव्वाचार वाजता अचानक भयानक आग लागली. या आगीत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एकूण २९ दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या.
आग लागल्यानंतर काही मिनिटांतच धुराचा प्रचंड लोट इमारतीत पसरला. यामुळे झोपेत असलेले रहिवासी घाबरून उठले आणि भीतीच्या वातावरणात इमारतीबाहेर धाव घेतली. आगीचा भडका उडाल्याने पाच जण किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या पथकाने काही वेळातच आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत बेसमेंटमधील बहुतेक दुचाकींचे मोठे नुकसान झाले होते. आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत अद्याप स्पष्ट कारण समोर आलेले नाही. ही आग
शॉर्ट सर्किट की इतर कोणत्या कारणानी लागली याचा तपास सुरु आहे. पोलिस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आग विझवल्यानंतर घटनास्थळाची कसून पाहणी केली. पहाटेच्या वेळी मोठी दुर्घटना टळली असली, तरी या आगीत मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
