श्री गुरु तेग बहादूर साहिब यांचे 350 वे शहीदी समर्पण वर्ष
प्रभातफेरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी दिला एकात्मतेचा संदेश
ठाणे: श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या ३५० व्या शहीदी समर्पण वर्षानिमित्त “हिंद की चादर” या उपक्रमानिमित्त विशाल हिंदी हायस्कूल आणि आझाद इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांची प्रभातफेरी उत्साहात काढण्यात आली. देशभक्ती आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणाऱ्या या प्रभातफेरीत विद्यार्थी, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रभात फेरी दरम्यान विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणाबाजी करत समाजात बंधुता, एकात्मता आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला. हातात फलक आणि बॅनर घेऊन विद्यार्थ्यांनी परिसरात जनजागृती केली. श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या शौर्य, त्याग आणि मानवतेच्या रक्षणासाठी दिलेल्या बलिदानाची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल जागरूकता निर्माण होण्याबरोबरच सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अशा उपक्रमांमुळे संस्कार व सामाजिक जाणीव वाढीस लागते, असे सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दोन्ही शाळांच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रभातफेरीला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
