बनावट लेबल लावून मद्याची महाराष्ट्रात विक्री

पाच जणांविरुद्ध गुन्हा, एक आरोपी फरार

डहाणू उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

योगेश चांदेकर

पालघरः पालघर जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या दीव दमण या केंद्रशासित प्रदेशातील सवलतीच्या दरातील मद्य महाराष्ट्रात आणून, त्यावर बनावट लेबल लावून विक्री करण्याचा प्रकार डहाणू उत्पादन शुल्क विभागाने उघडकीस आणला आहे. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एक जण फरार आहे.

पालघर हा गुजरात राज्य, तसेच दीव दमण आणि दादा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांना लागून आहे. दादरा नगर हवेली व दीव दमण येथे मद्यावर सीमा शुल्क आणि उत्पादन शुल्क नसल्याने तेथील मद्य अतिशय स्वस्तात विकले जाते. या मद्याची विक्री संबंधित केंद्रशासित प्रदेशात करणेच बंधनकारक आहे. अन्य राज्यात ते पाठवता येत नाही असे. असताना दीव दमण तसेच दादरा नगर हवेलीतील मद्य महाराष्ट्रात आणून त्याची विक्री केली जाते.

कर चुकवून मद्य महाराष्ट्रात

उत्पादन शुल्क आणि सीमा शुल्क चुकवून या मद्याची विक्री होण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने पालघर जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागाला डोळ्यात तेल घालून करडी नजर ठेवावी लागते. पालघर जिल्ह्यातील डहाणूचा उत्पादन शुल्क विभाग तसेच पालघरचे भरारी पथक सातत्याने कर चुकवून महाराष्ट्रात आणलेल्या मद्यावर कारवाई करत असते. बऱ्याचदा हे मद्य बनावट असते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो.

बाटल्यांवर बनावट लेबल

यापूर्वी अवैध मार्गाने आणलेल्या मद्याची तस्करी पकडली जात होती; परंतु या वेळी मात्र वेगळाच प्रकार उघडकीस आला. दीव दमण भागातील मद्य महाराष्ट्रात विक्री करता येत नाही. ते त्याच राज्यात विक्री करावी लागते; परंतु तेथील मद्य स्वस्तात खरेदी करून उत्पादन शुल्क तसेच सीमा शुल्क चुकवून महाराष्ट्रात आणण्यात आले आणि त्यातील बाटल्यांवरचे लेबल काढून तेथे महाराष्ट्रात विक्रीसाठी असे बनावट लेबल लावले जात होते. ही माहिती मिळताच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे डहाणूचे निरीक्षक सुनील देशमुख तसेच निरीक्षक अरुण चव्हाण, दुय्यम निरीक्षक विश्वजीत आभाळे, विकास आबनावे, अभिजीत मानकर आदींच्या पथकाने मोखाडा येथील गणपती मंदिरासमोर असलेल्या महेंद्र पिकअप वाहन क्रमांक (एम एच १५ जी व्ही ८८६) ही गाडी थांबून पाहणी केली.

एकाला अटक, पाच जणांवर गुन्हा, एक फरार

या गाडीच्या मागील बाजूस लोखंडी दरवाजा होता आणि त्याला कुलूप लावलेले होते. हे कुलूप उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने तसेच डहाणूचा पथकाने तोडून त्यातील मद्याचा साठा जप्त केला, पोलिसांनी भोरू खंडू बिन्नर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी स्वामी समर्थ किराणा दुकानाच्या मागील गच्चीवर छापा टाकला. तेव्हा तेथे महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी असलेले बनावट लेबल आणि काही बाटल्या आढळल्या. या वेळी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी एक जण फरार झालेला आहे

१८ लाखांचा साठा जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाने दीव दमण तसेच दादा नगर हवेलीत विक्रीसाठी असलेली एकूण १७ लाख ६७ हजार ३०० रुपयांचे अवैध मद्य जप्त केले. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त प्रदीप पवार, पालघरचे अधीक्षक गणेश बारगजे, उपअधीक्षक अविनाश रणपिसे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुनील देशमुख, अरुण चव्हाण विश्वजीत आभाळे, विकास आबनावे, अभिजीत मानकर, संदीप अहिरे, सत्यवान चोरघे, अमोल नलावडे, दीपक शेवाळे, प्रतीक गांगुर्डे, शशिकांत पाटील यांनी ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *