या देशात हिंदू जोवर संघटित होणार नाहीत तोवर हिंदूंच्या बाबत असेच होणार आहे, असे विधान केले आहे प्रसिद्ध अभिनेते आणि सावरकर साहित्याचे अभ्यासक शरद पोंक्षे यांनी. त्यांच्या या विधानाला संदर्भ आहे तो नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महानगरपालिकेत उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतान च्या फोटो लावण्याचा.
मालेगाव महापालिकेत उपमहापौर म्हणून निवडून आलेल्या मुस्लिम उमेदवाराने आपल्या दालनात टिपू सुलतान चा फोटो लावला. हे वृत्त प्रसारित होताच हिंदुत्ववादी संघटना आणि भारतीय जनता पक्षाने त्याला जोरदार विरोध केला आणि २४ तासात हा फोटो हटवा अन्यथा आम्ही तिथे येऊन तो फोटो काढून फेकू अशी धमकी दिली. प्रशासनाने लगेचच तो फोटो काढून टाकला. मात्र याबाबतीत प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान ची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांची केली. टिपू सुलतान आणि शिवाजी महाराज हे समकक्षच समजले पाहिजेत असे विधान त्यांनी केले. सहाजिकच त्यावर संतप्त अशा प्रतिक्रिया देखील उमटल्या. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सपकाळ यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी केली, तर नवनाथ बन यांनी चक्क त्यांची लाजच काढली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हर्षवर्धन सपकाळ नेमके इतिहास कुठे शिकले याचा शोध घ्यायला हवा असा टोला हाणला.
प्रस्तुत हा छत्रपती शिवाजी महाराज हे उभ्या महाराष्ट्राचे दैवत मानले जाते. महाराष्ट्रात जेव्हा एका बाजूला औरंगजेब साम्राज्य तर दुसऱ्या बाजूला आदिलशाही असे आक्रमण होत होते. त्यावेळी त्यांनी ग्रामीण मावळ्यांना एकत्र करत त्यांना सैनिकी शिक्षण दिले आणि वयाच्या सोळाव्या वर्षी मुघलांच्या तावडीतला पहिला तोरणा किल्ला जिंकला. त्यानंतर त्यांनी सरळ सरळ मोगल साम्राज्याला ललकारले. हळूहळू मुघलांचे प्रदेश आणि किल्ले जिंकत ते पुढे गेले आणि त्यांनी महाराष्ट्र स्थापित केला. हे सर्व करत असताना हिंदू पतपातशाही प्रस्थापित करण्याचाही त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला. मुस्लिमांचे सर्व जुलमी कायदे त्यांनी रद्दबातल ठरवीत हिंदूंना दिलासा कसा देता येईल हाच प्रयत्न केला. हे सर्व करत असताना त्यांनी मुस्लिमांचा आकारण दु:स्वास सुद्धा केला नाही. कल्याणचा खजिना लुटल्यावर तिथल्या सुभेदाराची सून जेव्हा त्यांच्याकडे नजराणा म्हणून आणली गेली, तेव्हा परस्त्री आपल्यासाठी मातेसमान आहे असे सांगत त्या कल्याणच्या सुनेची खणा नारळाने ओटी भरत साडीचोळी देऊन त्यांनी सन्मानाने रवानगी केली होती.
त्या तुलनेत टिपू सुलतान हा परकीय आक्रमक होता. त्याने भारतात येऊन इथल्या प्रदेशांवर आक्रमण करत ते ताब्यात तर घेतलेच, पण त्याच वेळी इथल्या हिंदूंवर अनन्वित अत्याचार देखील केले. हिंदूंना तलवारीच्या जोरावर बाटवून मुसलमान करण्याचा त्याने धडाका लावला होता. अनेक हिंदू स्त्रियांवर देखील त्याने लैंगिक अत्याचार केले. त्यासाठी त्याचे मुस्लिम सैनिक देखील आघाडीवर होते. त्याचबरोबर त्याने हिंदूंची कित्येक देवळे देखील फोडली, आणि तिथे मशिदी उभारल्या. अशा जुलमी राजाची तुला ना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करणे हा हर्षवर्धन सपकाळ यांचा मूर्खपणाच म्हणावा लागेल.
मात्र एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्राचे दैवत मानायचे, तर दुसरीकडे त्यांच्यावर टीका करायची हे काँग्रेसचे कायम धोरण राहिले आहे. काँग्रेसचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी आपल्या डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एक दरोडेखोर असा केला होता. नंतर त्यांनी माफी मागितली हा भाग वेगळा. तीच परंपरा हर्षवर्धन सपकाळ पुढे चालवत आहेत.
मात्र त्याचवेळी सपकाळ यांना विरोध करायला फक्त भाजपचे कार्यकर्ते आणि काही हिंदुत्ववादी संघटना पुढे आल्या मालेगावात टिपू सुलतान चा फोटो लावला जातो आहे किंवा हर्षवर्धन सपकाळ त्याची भलावण करत आहेत म्हणून सर्वसामान्य हिंदू रस्त्यावर आलेला नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. आज गावोगावी भाजपाचे कार्यकर्ते तिथल्या काँग्रेसच्या कार्यालयासमोर जाऊन निदर्शने करत आहेत. त्यांना उत्तर द्यायला तिथले काँग्रेस कार्यकर्ते समोर धावताना दिसत आहेत. पुण्यात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते यांच्यात राडा झाल्याचेही वृत्त वाहिन्यांवरून दाखवले जात आहे. आता काँग्रेसची बाजू घेऊन भाजप कार्यकर्त्यांशी भांडायला येणारे काँग्रेसचे कार्यकर्ते हे देखील बहुसंख्येने हिंदूच आहेत. आपल्या नेत्याने आपल्या दैवताची तुलना अशी जुलमी मुस्लिम शासकाशी करावी हे या हिंदू काँग्रेसी कार्यकर्त्यांना रुचले आहे असे समजायचे का? म्हणजेच त्यांना देखील शिवाजी महाराजांपेक्षा आपली हर्षवर्धन सपकाळच महत्त्वाचे वाटतात असे समजता येईल.
या मुद्द्यावर राजकारण करणारे देखील हिंदूच आहेत असे म्हणावे लागते. टिपू सुलतान चा फोटो लावला म्हणून टीका न करता शिवसेनेचे संजय राऊत हे देखील भाजपवरच टीका करण्यात धन्यता मानतात. हर्षवर्धन सपकाळ देखील आकारण वेगवेगळे दाखले देत आपल्या वक्तव्याचे समर्थन करतानाच दिसतात. ही काही हिंदूंची दुर्दैवी मानसिकता म्हणावी लागेल.
आपल्या देशात इंग्रजांचे राज्य असताना त्यांनी आपल्या सोयीने भारताचा इतिहास लिहिला. तीच परंपरा काँग्रेसने पुढे चालवली तिथे काँग्रेससोबत डाव्या विचारसरणीची मंडळी देखील पुढे आली. विशेष म्हणजे हे सर्व डावे बहुसंख्येने हिंदूच होते. अगदी नावे सांगायची तर श्रीपाद अमृत डांगे, ए बी वर्धन, तारा रेड्डी, वृंदा कारत ही सर्व हिंदू मंडळीच चुकीचा इतिहास पुढे नेण्यात कारणीभूत झाली होती, आणि ज्यांनी खरा इतिहास समोर आणण्याचा प्रयत्न केला त्यांना कायम अडचणी निर्माण करून हतोत्साहित कसे करायचे हेच या काँग्रेसी आणि डाव्या मंडळींनी प्रयत्न केले. छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास महाराष्ट्रासमोर आणणारे बाबासाहेब पुरंदरे यांना जेव्हा महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी त्याला प्राणपणाने विरोध करू बघणारे जितेंद्र आव्हाड हे हिंदूच आहेत. अशी अनेक उदाहरणे देता येतील. त्यामुळे हे हिंदूच हिंदूंचे वैरी बनत आहेत आणि हे हिंदू संघटित होत नाहीत. त्यामुळेच असे प्रकार घडतात.
खरे तर अयोध्येतले रामलला असोत, छत्रपती शिवाजी महाराज असोत, गुरु गोविंदसिंग असोत किंवा मग शंकराचार्य असोत, त्यांच्याबाबत कोणीही असे अपशब्द काढले तर प्रत्येक हिंदू ने संघटितपणे विरोध करायलाच हवा. हजरत बाल सारख्या मुद्द्यावर देशातला सर्व मुसलमान संघटीत होतो. एखाद्या अशाच मुद्द्यावर ख्रिस्ती समाजही संघटित होतो. मग हिंदूंनीच का संघटित होऊ नये याचाही विचार करायला हवा. म्हणूनच आता महाराष्ट्रात काय किंवा संपूर्ण देशात काय सर्वच हिंदूंनी पक्षभेद विसरून संघटित व्हायला हवे. शरद पोंक्षेंना नेमके हेच सुचवायचे असावे.

अविनाश पाठक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *