विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी लोकल ट्रेनमध्ये तातडीने अतिरिक्त डबे सुरू करा
वल्ली राजन यांची मागणी
कल्याण: १२वीच्या परीक्षेसाठी जात असताना गर्दीच्या लोकल ट्रेनमधून पडून १८ वर्षीय विद्यार्थी सचिन कठरे याचा झालेला दुर्दैवी मृत्यू ही केवळ अपघाती घटना नसून, उपनगरीय रेल्वे व्यवस्थेतील गंभीर दुर्लक्ष आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेप्रती असलेल्या बेफिकिरीचे द्योतक आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया वल्ली राजन, राज्य सचिव – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार यांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर त्यांनी कल्याण रेल्वे स्टेशन व्यवस्थापकांना निवेदन देऊन परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त लोकल डबे व स्वतंत्र सुरक्षित व्यवस्था तातडीने लागू करण्याची मागणी केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – विमुक्त भटक्या जमाती सेलचे कल्याण जिल्हाध्यक्ष दिनेश परदेशी तसेच समाजसेवक तोषेश शुक्ला उपस्थित होते.
दरवर्षी परीक्षा काळात हजारो विद्यार्थी प्रचंड गर्दीत, जीव मुठीत धरून लोकलने प्रवास करतात. ही परिस्थिती प्रशासनाला ज्ञात असतानाही ठोस उपाययोजना न होणे अत्यंत दुर्दैवी आहे. वरिष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी जशा विशेष सुविधा आहेत, त्याच धर्तीवर किमान १२वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र व सुरक्षित स्वतंत्र डब्बा सुरू करणे अत्यावश्यक आहे.
परीक्षा कालावधीत अतिरिक्त लोकल गाड्या किंवा डबे तातडीने सुरू करावेत. १२वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र, सुरक्षित डबे लागू करावेत. पीक अवर्समध्ये गर्दी नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था करावी या मागण्या रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आल्या असून “मानवी जीवन हे कोणत्याही व्यवस्थेपेक्षा मौल्यवान आहे. आणखी कोणत्याही विद्यार्थ्याचा बळी जाण्याआधी प्रशासनाने ठोस निर्णय घ्यावेत, असा इशारा वल्ली राजन यांनी रेल्वेला दिला आहे.
