आरोग्य यंत्रणेचा नाविन्यपूर्ण उपक्रम…!
मालवण: आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या जत्रोत्सवानिमित्त जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेने भाविकांच्या सेवेसाठी सज्ज ठेवलेले ‘सेफ हाऊस हॉस्पिटल ‘ हे खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरले आहे. जिल्हा रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे हा नाविन्यपूर्ण उपक्रम यंदाच्या जत्रोत्सवासाठी राबविण्यात आला होता आणि हा उपक्रम खऱ्या अर्थाने यशस्वीही ठरला.
या निमित्ताने दिनांक ८ ते १० फेब्रुवारी या कालावधीत हे’ सेफ हाऊस हॉस्पिटल ‘कार्यरत होते.या अत्याधुनिक छोटेखानी रुग्णालयात जत्रेला आलेल्या भाविकांपैकी पैकी ७३भाविक आकस्मिकपणे आजारी पडल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार करून त्यांना दिलासा देण्यात आला. यापैकी काहींना गंभीर आजार झाले होते.
जत्रेला येणाऱ्या अति महत्त्वाच्या व्यक्ती आणि सर्वसामान्य भाविकांना आपत्कालीन आरोग्य सुविधा मिळावी यासाठी यंदा ‘सेफ हाऊस हॉस्पिटल’चा हा नाविन्यपूर्ण उपक्रम तिन्ही आरोग्य यंत्रणांनी एकत्रितपणे राबवला होता. या रुग्णालयात अत्याधुनिक उपकरणे, आवश्यक साधन सामग्री आणि जीवन रक्षक औषधं सज्ज ठेवण्यात आली होती.
अत्यंत गंभीर आणि तीव्र हृदय विकार असलेल्या रुंगणांवर त्या ठिकाणी तातडीने प्राथमिक उपचार करण्यात आले तसेच काहींना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले. दुर्दैवाने एका रुग्णाचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
उत्सवाच्या दरम्यान हृदयविकार,अतिसार ,उलट्या गॅस्ट्रो व अन्नबाधा असलेले १६ रुंग्ण,निमोनिया, सर्दी, खोकला असलेले १४ रुंग्ण (बालके ), तीव्र खोकला व सर्दी झालेले १३ प्रौढ रुंग्ण, दमा व निमोनियाचे ८ तर अस्थिव्यंग व फ्रॅक्चर असलेले ७ रुंग्ण, अशा सर्वांना सेवा देण्यात आली.
आरोग्य सेवेचे हे अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनंत दवंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा नाविन्यपूर्ण उपक्रम यंदा राबवण्यात आला.
डॉ सुबोध इंगळे, डॉ.गौरव घुर्ये डॉ. संजय पोळ, डॉ. वर्षा शिरोडकर, डॉ.सुधीर धनगे आदींनी या उपक्रमात प्रत्यक्ष सहभाग घेतला. दरम्यान उद्या महाशिवरात्री निमित्त देवगड तालुक्यातील कुणकेश्वर जत्रेच्या निमित्ताने हा उपक्रम राबवला जाणार आहे.
