माझगाव ताडवाडीतील बी.आय.टी. चाळ पुनर्विकास प्रकरणी

२१ वर्षांपासून रखडलेला प्रकल्प मार्गी लागण्याची चिन्हे

मुंबई: माझगाव ताडवाडी येथील बी.आय.टी. चाळ पुनर्विकास प्रकरणी म्हाडा, बृहन्मुंबई महानगरपालिका, विकासक व सर्व संबंधित अधिकाऱ्यांची महानगरपालिका आयुक्तांच्या उपस्थितीत तातडीने संयुक्त बैठक आयोजित करावी. परस्पर समन्वयाने प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढून रखडलेल्या पुनर्विकास कामाला गती द्यावी आणि त्याबाबतचा सविस्तर अहवाल आठ दिवसांत सादर करावा, असे निर्देश राम शिंदे यांनी दिले.

माझगाव ताडवाडी येथील बी.आय.टी. चाळ क्रमांक १ ते १६ तसेच ए, बी, सी ब्लॉकच्या पुनर्विकासासंदर्भात विधानपरिषद सदस्य शशिकांत शिंदे यांनी १७ जुलै २०२५ रोजी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यानुषंगाने आज १६ फेब्रुवारी २०२६ रोजी विधान भवन येथे सर्व संबंधितांची बैठक आयोजित करण्यात आली.

या बैठकीस आमदार शशिकांत शिंदे, आमदार सचिन अहिर, आमदार मनोज जामसुतकर, माजी मंत्री बाळा नांदगावकर, म्हाडाचे मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले की, तब्बल २१ वर्षांपासून आपल्या हक्काच्या घरांपासून वंचित असलेल्या रहिवाशांना तातडीने दिलासा मिळणे गरजेचे आहे. पुनर्विकास प्रकल्प रखडल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून अनेक कुटुंबे तात्पुरत्या निवासस्थानी गैरसोयीच्या परिस्थितीत राहत आहेत. त्यामुळे हा प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधितांनी समन्वय साधावा, विकासकासमवेत संयुक्त बैठक घेऊन कामाला तातडीने सुरुवात करावी आणि आठ दिवसांत प्रगती अहवाल सादर करावा, असे त्यांनी स्पष्ट निर्देश दिले.

२१ वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाला आता गती मिळण्याची शक्यता व्यक्त होत असून रहिवाशांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *