कौशल्य म्हणजे काय हे बघायचे असेल तर आपल्याला या दीडशे वर्षे सुरु असलेल्या एका जपानी कारखान्यात जावे लागेल. आजही या कारखान्यात सगळे काम कारागीर आपल्या हातांनी करतात आणि त्यात जी सफाई ते दाखवतात त्यांनी आपण चकित होऊ शकतो. असे मानले जाते की अमेरिकेचे सुप्रसिद्ध उद्योगपती स्टीव्ह जॉब्ज यांना आपला आयफोनच्या आवरण-डब्याची प्रेरणा याच कारखान्यातून मिळाली होती.
या कामगारांचे कौशल्य काही पिढ्यांचे असावे असे वाटते कारण इतकी अचूकता आजच्या काळात दाखवल्यानेच हा कारखाना आजही उत्तम रीतीने सुरु आहे. जगातील अत्यंत जुन्या आणि आजही सुरु असलेल्या कारखान्यातील कुशल कामगारांच्या सहनशीलतेचे रहस्य जाणून त्यावर एक पुस्तक लिहिण्यासाठीच्या आपल्या प्रवासात लेखकाला हा कारखाना जपानमध्ये आढळला. जपानमधील क्योतो शहरातील छोट्या आकाराच्या निवासी इमारतींच्या सोबतच लेखक शोधत असलेला कारखाना त्याला सापडला. या कारखान्याविषयी अनेकदा लिहिले गेले होते. दारावर कारखान्याच्या नावाची एक छोटीशी पाटी होती इतकेच. कुठलाही जामानिमा अथवा भेटीला येणाऱ्या माणसावर ‘इम्प्रेशन’ मारण्यासाठी इथे काहीही नव्हते हेही वैशिष्ट्यपूर्ण होते.
‘काईकाडो’ हे कंपनीचे नाव आणि तिची स्थापना १८७५ सालची आहे. जपान नुकताच अनेक शतकांच्या नंतर काहीसा स्थिर होत होता. कारखान्यात उत्पादन होणारी वस्तू ऐकून चकित व्हावे लागेल. इथे चहाच्या किटल्या (येथील भाषेत चाझुत्सू) बनतात पण त्या इतक्या सुबक आणि अचूक की त्यातून वाफ बाहेर जाणे जवळ जवळ अशक्य असल्याने चहा हमखास ताजा राहतो. कंपनीचे हे एकमेव उत्पादन आहे आणि ते गेली दीडशे वर्षे लोकप्रिय आहे. कामगारांच्या सहा पिढ्यांनी येथे काम केले असून अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीची बरोबरी करू शकेल अशी अचूकता येथे कामगाराच्या बोटांमधून उमटते.
तांबे आणि पितळ तसेच टिनाचे पत्रे हा कच्चा माल आपला नंबर कधी लागणार त्या प्रतीक्षेत होता. हे पत्रे वळवून त्यांना आकार देणे एकाग्रतेने सुरु होते. या कारखान्यातील उमेदवारीचा काळ जवळजवळ दहा वर्षांचा असतो. येथील चहाची किटली बनविण्यात किमान १०० कौशल्ये आवश्यक असतात. झाकण तर इतके अचूक की ते उघडताना केवळ ‘फुस्स’ असा आवाज येतो तितकाच. आजच्या यू ट्यूबच्या जमान्यात हातांनी अशी काही कामगिरी करणे ही नवलाचीच बाब आणि कौशल्य म्हणतात ते हेच आहे.
आज एकाग्रता आणि ध्यानधारणा या गोष्टी काम करून घरी आल्यानंतर जमतील तशा केल्या जातात परंतु या कारखान्यात तर प्रत्येक कामगार हा इतका एकाग्रतेने काम करीत होता की त्याची बोटे आणि हात चालत असले तरी तो ध्यानस्थ आहे असेच वाटत होते.
आजच्या काळात असे कौशल्य मिळवणे हे खूपच कमी लोकांना शक्य असते हे देखील खरे आहे. आज यश गुणवत्तेत नाही तर उत्पादनात मोजले जाते. आपल्या अपेक्षा खूप असतात पण त्यात एकाग्रतेचा सहभाग अगदी कमी असतो ही आजच्या कामाची शोकांतिका आहे असे म्हणावे लागेल त्यामुळे हा कारखाना आणि तेथील कामगार उत्कृष्ट कौशल्याचा जागतिक नमूना आहेत.
प्रसन्न फीचर्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *