अनिल ठाणेकर
ठाणे, मालवणी चवीचा सुगंध, पारंपरिक वेशभूषेची रंगत आणि लहानग्यांच्या टपोऱ्या डोळ्यांतला आत्मविश्वास, अशा जल्लोषी वातावरणात ठाण्यातील मालवणी महोत्सवात रविवारी रंगलेल्या स्थानिक बालगोपाळांच्या नृत्य स्पर्धा अक्षरशः डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या ठरल्या. ढोलकीच्या तालावर, मराठी, हिंदी, कोकणी गाण्यांच्या लयीवर आणि टाळ्यांच्या कडकडाटात बालकलाकारांनी रंगमंच गाजवला; पाहणारे रसिकही या सादरीकरणाने बालपणात हरवून गेले.
कोकण ग्राम विकास मंडळा तर्फे आयोजित “मालवणी महोत्सव -२०२६” ला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून हा महोत्सव १८ फेब्रुवारीपर्यंत स्व. अजितदादा पवार महोत्सव नगरी, शिवाईनगर उन्नती मैदान येथे सुरू आहे. रविवारी सायंकाळी स्थानिक बालगोपाळांच्या नृत्य स्पर्धांच्या अदाकारींनी उपस्थित रसिकांची मनं जिंकली. या नृत्य स्पर्धेत ग्रुप डान्स ३० गट आणि सोलो डान्स या गटांमध्ये ३० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. रंगीबेरंगी पारंपारिक वेशभूषा, तालबद्ध हालचाली आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे महोत्सवात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
००००००००
