महाविद्यालयात भाजी, फळे आणि फुलांचा महोत्सव
रमेश औताडे
मुंबई : वृक्षप्रेमींच्या राष्ट्रीय संस्थेच्या वतीने आयोजित ६३ वा वार्षिक भाजीपाला, फळे आणि फुलांचा सोहळा माटुंगा येथील डी जी रूपारेल कॉलेज च्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला. दोन दिवस चाललेल्या या प्रदर्शनात विविध रंगांची फुले, देखणी बाग मांडणी, दुर्मिळ वनस्पती, उभी बाग, बोन्साय, ऑर्किड्स आणि विदेशी फुलांची आकर्षक सजावट पाहायला मिळाली. मुंबईच्या हवामानात यशस्वीपणे वाढवलेले ट्यूलिप्स, युकोमिस आणि रेड हायसिंथ या फुलांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधले.
मुंबई महानगर पालिका, भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटर, भारत पेट्रोलियम, सेंट्रल रेल्वे, गोदरेज ग्रुप, हिरानंदानी ग्रुप, इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड, रहेजा ग्रुप, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि वेस्टर्न रेल्वे आदी संस्थांनी सहभाग घेतला.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. अरुण डी. सावंत, मानद सरचिटणीस शसकीना गाडीवाला आणि शो समिती अध्यक्ष डॉ. चंद्रकांत साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली सोहळा आयोजित करण्यात आला. पर्यावरण जपण्याचा संदेश देत हा हरित उत्सव शहराच्या सांस्कृतिक जीवनात नवचैतन्य निर्माण करत राहील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
