शस्त्राच्या बळापेक्षा आत्मबळ महत्त्वाचे – डॉ. अवनीश पाटील

ठाणे : बॉम्ब व बंदुकीच्या बळावर मिळवलेला न्याय भीतीवर आधारित असल्याने तो फार काळ टिकत नाही. शस्त्रापेक्षा आत्मबळ महत्वाचे असे मत बीजभाषक प्रा. डॉ. अवनीश पाटील यांनी व्यक्त केले. ते बाबा नाईक महाविद्यालय कोकरूड इतिहास व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष विभागाने आयोजित केलेल्या “महात्मा गांधींच्या विचारांची समकालीन प्रस्तुतता” या एकदिवशीय ऑनलाईन राष्ट्रीय परिषदेत बोलत होते. ते पुढे म्हणाले की अण्वस्त्रांच्या युगात अहिंसेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मानवी जीवन आनंदी होण्यासाठी गांधीवाद पथदर्शक आहे.

या राष्ट्रीय परिषदेचे उदघाटक एडवोकेट भगतसिंग नाईक (नाना) हे होते. उद्घाटन सत्राच्या अध्यक्ष प्राचार्य डॉ. उज्वला पाटील यांनी गांधीजींचे विचार हे मानवी जीवनाला तारणहार असल्याचे मत व्यक्त केले. उद्घाटन सत्रातील पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. अनिल काटे यांनी केला. तर आभार उपप्राचार्य प्रा. डॉ. विनोद राठोड यांनी मानले. प्रथम सत्राचे साधन व्यक्ती चंद्रकांत झटाले यांनी ‘मजबुती का नाम महात्मा गांधी’ याविषयी सखोल मांडणी केली. महात्मा गांधीजी हे जगातील सर्वात निर्भय व्यक्ती होती. त्यांच्यावरती सहा वेळा जीवघेणे हल्ले झाले तरी त्यांनी सुरक्षा व्यवस्था स्वीकारली नाही. गांधीजींच्या वरील अनेक आक्षेपांची  त्यांनी अभ्यासपूर्ण व चिकित्सक उत्तरे दिली. सत्राध्यक्ष प्रा. डॉ. चंद्रवधन नाईक यांनी गांधीजींच्या विचाराने प्रभावित होऊन जनसमुदाय त्यांच्या पाठीशी उभा राहिला. गांधीजींची नई तालीम ही स्वावलंबी शिक्षण प्रणाली असल्याचे मत व्यक्त केले. या सत्रातील पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. तानाजी हवलदार यांनी केला तर आभार प्रा. चंद्रशेखर काटे यांनी मानले.द्वितीय सत्राचे साधन व्यक्ती प्रा. डॉ. पंकज सिंह डॉ. हरिसिंग गौर विश्वविद्यालय सागर मध्य प्रदेश हे होते. त्यांनी ‘महात्मा गांधींच्या विचारांची समकालीन प्रस्तुतता’ याविषयी मांडणी केली. आज जागतिक स्तरावरती सुरू असलेली युद्धे व हिंसा थांबवण्यासाठी गांधीजींची सत्य, अहिंसा व सत्याग्रह या मूल्यांची नितांत आवश्यकता आहे. धार्मिक द्वेष नष्ट करण्यासाठी गांधीजींची धर्मसहिष्णुता खूप गरजेची आहे. हिंसा, लोभ व विषमतेने ग्रासलेल्या जगाला बाहेर काढण्यासाठी गांधीजींचा सत्य, अहिंसा, अपरिग्रह आणि श्रमप्रतिष्ठेचा मार्गाचा स्वीकार करणे अपरिहार्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. सत्राध्यक्ष प्रा. सतीश चौगुले यांनी भक्ती ही कधीच ज्ञानाच्या आड येता कामा नये. आज वेगवान प्रगती सोबत सामाजिक तणाव व मानसिक अस्थिरता वेगाने वाढत आहे, यावरती गांधीमार्ग हाच उपाय आहे असे मत व्यक्त केले. या सत्रातील पाहुण्यांचा परिचय प्रा. संगीता जावरकर व डॉ. संजीवनी कांबळे यांनी केला. तर आभार प्रा. डॉ. सतीश ढोरे यांनी मानले. प्रा. डॉ. अजितकुमार जाधव, प्रा. डॉ. सुरेश चव्हाण व प्रा. डॉ. सुभाष बेंगेलवार यांनी मनोगते व्यक्त केली.

या राष्ट्रीय परिषदेसाठी अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. भारतातील विविध राज्यातून ४२७ व्यक्तींनी नावनोंदणी केली. या राष्ट्रीय परिषदेचे संयोजक प्रा. डॉ. काशिलिंग गावडे, प्रा. डॉ. सतीश ढोरे व प्रा. डॉ.अनिल काटे यांनी केले. प्रा. डॉ. संदीप देशमुख यांची तांत्रिक सहाय्यासाठी मोलाची मदत झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *