संतापजनक: मढयाच्या टाळूवरील

लोणी खाणारे ते अधिकारी कोण ?

अजितदादांच्या निधनानंतर काही तासातच

त्यांनी रोखलेल्या ७५ फाईलांना संशयास्पद मंजुरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून गंभीर दखल

 फडणवीसांनी दिली मंजुरीला स्थगीती

स्वाती घोसाळकर

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघातामुळे अवघा महाराष्ट्र दुखात होत असताना महाराष्ट्राच्या मंत्रालयात मात्र हीच संधी साधून अजित पवारांनी रोखलेल्या ७५ फाईलींना संशयास्पदरित्या मंजुरी देण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलाय. मेलेल्या मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणारा हा अधिकारी कोण याचा शोध घ्यावा अशी संतप्त प्रतिक्रीया राजकीय वर्तुळात उमटली आहे.

अजित पवारांचं २८ जानेवारीला सकाळी नऊच्या दरम्यान विमान अपघातात निधन झालं. आणि हीच संधी साधत अजितदादांनी थांबवून ठेवलेल्या काही फाइल्सवर दुपारी ४ वाजता सह्या करण्यात आल्या आणि ७५ शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जाचं प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं. या घटनेची माहिती समोर येताच मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. तसंच या प्रमाणपत्रांना स्थगिती देण्यात आल्याचा निर्णय घेतला आहे.

२८ जानेवारीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला सकाळी ८ वाजून ४६ मिनिटांनी अपघात झाला. विमानाचं क्रॅश लँडिंग झालं. विमानात अजित पवारांसह उपस्थित असलेल्या सगळ्यांचा या अपघातात मृत्यू झाला. या घटनेला काही तास उलटत नाहीत तोच मंत्रालयात वेगाने चक्रं फिरली आणि २० संस्थांच्या ७५ शाळांना अल्पसंख्याक दर्जाचं प्रमाणपत्र देण्यात आलं. अल्पसंखअयाक विकास विभागाकडून अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र देणं अपेक्षित होतं. मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी ही मंजुरी दिली. विशेष बाब म्हणजे १२ ऑक्टोबर २०२५ ला माणिकराव कोकाटेंनी या प्रमाणपत्र वाटपाला स्थगिती दिली होती. कोकाटेंना मंत्रिपद सोडावं लागल्यानंतर हा विभाग अजित पवारांकडे होता. त्यांच्या निधनानंतर अवघ्या काही तासांतच मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी हा प्रताप केल्याचं समोर आलं.

“अजितदादांच्या निधनाच्या दिवशी ज्या सह्या करण्यात आल्या आणि शाळांना अल्पसंख्याक दर्जाची प्रमाणपत्रं देण्यात आली हे नेमकं कोणाच्या इशाऱ्यावर केलं? यालाजबाबदार कोण आहेत ? हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे. अजितदादा खमके व्यक्तिमत्त्व होते, प्रशासनावर त्यांची मजबूत पकड होती. त्यांच्या निधनातून सावरण्याआधीच असे कृत्य झाले असेल, तर  दोषींवर तत्काळ कारवाई झाली पाहिजे. टाळूवरचे लोणी खाणे ही म्हण इथे लागू पडते. त्यामुळे या घटनेचा आणि सरकारचा आम्ही निषेध व्यक्त करतो.” असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

सर्वच वंगाळ झालंय, माणसाची काही किंमत आहे कि नाही ? थोड्या फार तर भावना, संवेदना असायला हव्यात की नाही ? असा प्रश्न विचारत रोहित पवारांनी पोस्ट लिहिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *