सुनेत्रा पवारच राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा
येत्या २६ फेब्रुवारीला होणार शिक्कामोर्तब
राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय
स्वाती घोसाळकर
मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा होणार आहे. आज झालेल्या आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. येत्या २६ फेब्रुवारीला होणाऱ्या पक्षाच्या विशेष अधिवेशनात यावर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी लगोलग उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानुसार, पदभार स्वीकारत कामाला देखील सुरुवात केली होती. परंतु प्रफुल पटेल हे राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी उत्सुक असल्याच्या बातम्या आल्यामुळे संभ्रमाचे वातावरण होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदी कुणीही मराठा चालेल पण पटेल नको असे व्टिट केल्यामुळे हा वाद चांगलाच चिघळला होता. त्यातच केंद्रीयमंत्री पियुष गोयल यांनीही एका मुलाखतीत प्रफुल पटेल यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदी त्यांचं नाव घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. आता मात्र यावर पडदा पडला आहे. स्वता प्रफुल पटेलांनीच राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवार यांचे नाव सुचवले आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत आज झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीस आमदार, खासदार आणि प्रमुख नेत्यांची उपस्तित होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत विलिनीकरणाच्या संदर्भात तूर्तास चर्चा नाही. विलिनीकरणाच्या संदर्भात बाहेर माध्यमांमध्ये बोलू नये अशा सूचना बैठकीत आमदारांना दिल्या आहेत. पक्ष संघटना वाढ, राष्ट्रीय अध्यक्ष निवड आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या संदर्भातील चर्चा आजच्या बैठकीत झाल्याची माहिती आहे.
