एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच –सरनाईक
मुंबई : राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’च्या सुरक्षेला आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे बळ मिळणार आहे. दहशतवादी आणि समाजविघातक प्रवृत्तींच्या संभाव्य धोक्यांचा विचार करून राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने एक महत्त्वाकांक्षी ‘नवीन सीसी टीव्ही कॅमेरा प्रकल्प’ हाती घेतला. या प्रकल्पाच्या माध्यमातून एसटीच्या बसस्थानकांपासून ते विभागीय कार्यालयांपर्यंत सर्व महत्त्वाच्या ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत राज्य शासनाने या प्रकल्पासाठी तब्बल १११ कोटी रुपये निधी उपलब्ध केला आहे. या निधीच्या सहाय्याने एसटीची बस स्थानके, आगार, विभागीय कार्यशाळा, मध्यवर्ती कार्यशाळा, विभागीय कार्यालये; तसेच मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था भोसरी यासारख्या संवेदनशील ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याचे नियोजन केले आहे. एकूण ६३३ ठिकाणी तब्बल ७,०३५ सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, यामुळे या ठिकाणच्या प्रत्येक हालचालीवर सतत नजर राहणार आहे, असे सरनाईक म्हणाले.
या अत्याधुनिक प्रकल्पाची जबाबदारी इ-निविदा प्रक्रियेद्वारे निवडलेल्या टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेड (टीसीआयएल) या संस्थेकडे सोपवली आहे. त्यांच्या माध्यमातून प्रकल्पाची अंमलबजावणी वेगाने आणि प्रभावीपणे सुरू असून, या प्रकल्पाचा एकूण कालावधी एक वर्ष निश्चित केला आहे. या प्रकल्पाचा मुख्य कणा ठरणारे मध्यवर्ती नियंत्रण कक्ष मुंबई येथे उभारण्यात आले असून, त्याची वापरकर्ता स्वीकृती चाचणी (यूएटी) यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. या नियंत्रण कक्षातून राज्यभरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यांवर केंद्रीकृत पद्धतीने लक्ष ठेवले जाणार आहे. त्यामुळे कोणतीही संशयास्पद हालचाल तात्काळ ओळखून आवश्यक ती कार्यवाही करता येईल.
प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आलेल्या या प्रकल्पात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर विभागांतील ६४ महत्त्वाच्या ठिकाणी सीसी टीव्ही प्रणाली यशस्वीरित्या बसविण्यात आली आहे. उर्वरित २७ विभाग, तसेच विविध कार्यशाळा आणि कार्यालयांमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याची पुढील कार्यवाही सध्या वेगाने सुरू आहे. या प्रकल्पामुळे एसटीच्या बसस्थानकांवर आणि कार्यालये सुरक्षित होतील. प्रवाशांचा विश्वास अधिक दृढ होणार असून कोणत्याही अनुचित घटनांवर त्वरित नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.
