ठाणेवैभव आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धा
ए टी स्पोर्ट्स दुसऱ्या फेरीत
ठाणे : ए टी स्पोर्ट्सने डब्ल्यू एन एस ग्लोबल सर्व्हिसेस संघाचा एक गडी राखून पराभव करत सुवर्णमहोत्सवी ठाणेवैभव आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धेच्या क गटात दुसऱ्या फेरीत स्थान मिळवले. डब्ल्यू एन एस ग्लोबल सर्व्हिसेस संघाचे २१५ धावांचे आव्हान ए टी स्पोर्ट्स संघाने ९ गड्यांच्या मोबदल्यात २१६ धावा बनवत विजय मिळवला. संघाच्या विजयात एका विकेटसह नाबाद ३२ धावांचे योगदान देणाऱ्या सिद्धार्थ यादवला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला.
सुनील यादवची ५२ धावांची अर्धशतकी खेळी, विनीत ठक्करच्या ३८ आणि साहिल गायकरच्या ३१ धावांमुळे डब्ल्यू एन एस ग्लोबल सर्व्हिसेस संघाला द्विशतकी धावसंख्या उभारता आली. या डावात अमोल तोरवीने तीन, समृद्ध गुप्ता आणि वंशम व्होराने प्रत्येकी दोन बळी मिळवले. उत्तरादाखल शिवम घोषने ६९, प्रल्हाद मोरेने ४४ आणि सिद्धार्थ यादवने नाबाद ३२ धावा बनवत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या डावात संकेत महाडिकने ४ फलंदाज बाद करत संघाला विजयाची आस लावली होती.
संक्षिप्त धावफलक : डब्ल्यू एन एस ग्लोबल सर्व्हिसेस : ३५ षटकात सर्वबाद २१५ ( सुनील यादव ५२, विनीत ठक्कर ३८, साहिल गायकर ३१, अमोल तोरवी ७-५७-३, समृद्ध गुप्ता ७-३२-२, वंशम व्होरा ७-५८-२) पराभुत विरुद्ध ए टी स्पोर्ट्स: ३४.२ षटकात ९ बाद २१६ ( शिवम घोष ६९,प्रल्हाद मोरे ४४, सिद्धार्थ यादव नाबाद ३२, संकेत महाडीक ७-४४-४).
