टी २० विश्वचषक स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ६१ धावांनी धुव्वा उडवत सुपर ८ मध्ये दिमाखात प्रवेश केला. रविवारी झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला अक्षरशः चारी मुंड्या चीत केले. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रात भारताने पाकिस्तानवर वर्चस्व गाजवत हा सामना जिंकला. या सामन्यात पाकिस्तान भारताच्या जवळपासही पोहचू शकला नाही. हा विजय मिळवून भारताने पाकिस्तानवरील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. विश्वचषकात पाकिस्तान भारताला फक्त एकदाच हरवू शकला. भारताने मात्र पाकिस्तानला तब्बल ८ वेळा हरवले आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर ईशान किशनने वादळी सुरवात करून भारताला पावणे दोनशेचा टप्पा गाठून दिला. त्याने आक्रमक अर्धशतक झळकावले त्याला सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, तिलक वर्मा, रिंकू सिंग यांनी चांगली साथ दिली. भारतीय गोलंदाजांनी तर कमाल केली. भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तानच्या फलंदाजानी अक्षरशः नांगी टाकली. त्यांचा कोणताच फलंदाज भारतीय गोलंदाजीपुढे टिकू शकला नाही. जसप्रीत बुमरा, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव या भारताच्या सर्व प्रमुख गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी करून पाकिस्तानी फलंदाजांना जेरीस आणले. पाकिस्तानचे फलंदाज कसेबसे शतक पार करून शकले. पाकिस्ताला नमवण्यापूर्वी भारताने अमेरिका आणि नामिबियालाही असेच एकतर्फी नमवून विजय मिळवला होता. आज भारताचा नेदरलँडशी मुकाबला आहे. हा मुकाबला ही भारत एकतर्फी जिंकेल यात शंका नाही. आता भारत सुपर ८ मध्ये पोहचला आहे. विश्वचषकाची खरी लढाई आता सुरू झाली आहे असे म्हणावे लागेल कारण जगातील सर्वोत्तम आठ संघ सुपर ८ मध्ये असतील. तिथे लढाई सोपी नसेल कारण सर्वच संघ जिंकण्यासाठी खेळतील. टी २० क्रिकेटमध्ये कोण जिंकेल हे कोणीच छातीठोकपणे सांगू शकत नाही कारण एखादे चांगले षटक किंवा एखादी छोटी पण महत्वपूर्ण खेळी सामन्याचे चित्र पालटवते पण सध्याचा फॉर्म पाहता भारत, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज या संघांना उपांत्य फेरीत पोहचण्याची संधी आहे. न्यूझीलंडही उपान्त्य फेरीत पोहचू शकतो. हेच संघ विजेतेपदाचे दावेदार आहेत मात्र भारत हा विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे कारण या सर्व संघात भारतीय संघ तुफान फॉर्मात आहे. भारताची फलंदाजी इतर कोणत्याही देशांच्या फलंदाजी पेक्षा बळकट आहे. भारताचे गोलंदाजही लयीत आहेत. भारताचे वेगवान गोलंदाज असोत की फिरकी गोलंदाज सर्वच प्रतिस्पर्धी फलंदाजावर भारी पडत आहे. भारताचे क्षेत्ररक्षणही चांगले होत आहे. सूर्यकुमार यादव हा या संघाचे नेतृत्व कुशलतेने करत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे भारत आपल्या प्रेक्षकांसमोर आणि घरच्या मैदानावर खेळत आहे त्यामुळे त्याचा फायदा भारतीय संघाला मिळत आहे. याचाच अर्थ सर्व परिस्थिती भारतासाठी अनुकूल आहे. भारतीय संघाने या अनुकूल परिस्थितीचा फायदा उचलून संघाला विश्वविजयी करावे अशी अपेक्षा देशातील १४५ कोटी जनता करत आहे. भारताने जर तसे केले तर इतिहास घडेल. जर भारताने हा विश्वचषक जिंकला तर तीनवेळा विश्वचषक जिंकणारा भारत हा पहिला संघ ठरेल. याआधी असा पराक्रम कोणत्याही संघाने केला नाही याचाच अर्थ भारत इतिहास डिफिट करेल शिवाय सलग दोनदा विश्वचषक जिंकणारा भारत हा पहिला संघ ठरेल. म्हणजेच सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकून भारत इतिहासाची पुनरावृत्ती करेल म्हणजेच इतिहास रिपीट करेल. इतिहास डिफिट आणि रिपीट करण्यासाठी भारतीय संघाला मनापासून शुभेच्छा!
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
श्याम ठाणेदार
