शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मोहन्यात पार पडला रोजगार मेळावा
तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी नगरसेवक राहुल कोट यांचा पुढाकार
कल्याण : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त कल्याण-डोंबिवली महानगरपालिका व लाईटहाउस कम्युनिटीज फाउंडेशन यांच्या सहकार्याने आम्ही सेवेकरी सामाजिक संस्था, मोहोने अध्यक्ष नगरसेवक राहुल कोट यांच्या वतीने आंबिवली पूर्वेतील मोहने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, नालंदा बौद्ध विहार याठिकाणी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन आज मंगळवारी करण्यात आले होते. नगरसेवक राहुल कोट यांच्या पुढाकाराने हा रोजगार मेळावा पार पडला.
सद्ध्याच्या तरुणाईला रोजगाराचा प्रश्न भेडसावत असून तरुणांच्या हाताला रोजगार देण्याचे आश्वासन नवनिर्वाचित नगरसेवक राहुल कोट यांनी निवडणुकीत दिले होते. नागरिकांना दिलेले वचन पूर्ण करत या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात १०वी, १२वी, पदवीधर, आयटीआय, डिप्लोमा, इंजिनिअरिंग आदी शैक्षणिक पात्रता असलेल्या फ्रेशर व अनुभवी उमेदवारांनी सहभाग घेतला. या उमेदवारांना मॅन्युफॅक्चरिंग, कंपनी वर्कर, ऑफिस, बॅक ऑफिस, डेटा एंट्री, बीपीओ, कॉल सेंटर, सेल्स, मार्केटिंग, हॉस्पिटल, हेल्थकेअर, सिक्युरिटी सर्व्हिसेस, ड्रायव्हर, हेल्पर, फील्ड जॉब, आयटी, कॉम्प्युटर, आयटीआय, सोशल मार्केटिंग आदी संबंधित नोकऱ्या उपलब्ध होत्या.
यावेळी माजी आमदार प्रकाश भोईर, नगरसेविका स्वप्नाली केणे, तेजश्री गायकवाड, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कल्याण शहर अध्यक्ष विनोद केणे, माजी नगरसेवक दया शेट्टी, माजी नगरसेविका सुनंदा कोट, माजी नगरसेवक मुकुंद कोट, महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना विभाग अध्यक्षा अनिता कोट आदी मान्यवर उपस्थित होते. लाईटहाउस कम्युनिटीज फाउंडेशनचे क्लस्टर हेड निकेश पाटील, सेंटर हेड एकता कदम, प्लेसमेंट मॅनेजर देवा रिकामे, धनंजय काकडे आदींनी या रोजगार मेळाव्याचे नियोजन केले.
मेळावा यशस्वी करण्यासाठी हेमंत गायकवाड, लक्ष्मण जाधव, रोहित सोनावणे, अमित कोट, संदेश कोट, हरीश जावळे, रिंकू पाटील, जय पाटील, जावेद सय्यद, अरुण कांबळे आदींनी परिश्रम घेतले. या मेळाव्यात २६ कंपन्यांनी सहभाग घेतला. तर २१५ तरुणांनी रोजगार मेळाव्यात मुलाखत दिली. यापैकी मुलाखतींच्या दुसऱ्या फेरीसाठी १०२ उमेदवारांची निवड करण्यात आली. एका विद्यार्थ्याला स्पॉट ऑफर मिळाली. कोटक महिंद्रा बँक, एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस, सारशी अभियांत्रिकी प्रायव्हेट लिमिटेड, रेड रोझ गारमेंट्स, पटेल रिटेल मार्ट्झ युनिकेअर हेल्थ केअर इत्यादी कंपन्या उपस्थित होत्या.
