सिंधुदुर्गातील नगरपरिषदा – नगर पंचायतींना निधी वाढवून मिळावा- निलेश राणे

सिंधुदुर्गनगरी(प्रतिनिधी)–सिंधुदुर्ग हा देशातील एकमेव पर्यटन जिल्हा आहे जिल्ह्यात पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असतात आणि दरवर्षी त्यात वाढ होत आहे परिणामी जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींवर त्याचा ताण पडत आहे हे लक्षात घेऊन नगरोत्थान निधी वाढवून मिळावा यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन आणि विकास मंडळाच्या बैठकीत बोलताना केले. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाची बैठक नुकतीच जिल्हा नियोजन मंडळाच्या सभागृहात पार पडली.

राज्यातील इतर पालिकांच्या तुलनेत जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचे वार्षिक अंदाजपत्रक खूपच कमी आहे ते वाढविण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला पाहिजे आणि त्याद्वारे अंदाजपत्रक वाढवले पाहिजे असे आमदार राणे यांनी सुचित केले. या विषयावर आपली भूमिका मांडताना राणे यांनी पंढरपूर पालिकेचे उदाहरण दिले. पंढरपूरची लोकसंख्या आपल्या पालिकांपेक्षा कमी आहे परंतु त्या पालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक ७५ कोटी इतके आहे. यासंदर्भात अधिक माहिती घेता असे समजले की पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे आणि त्या माध्यमातून पंढरपूर नगरपरिषदेने आपल निधी वाढवून घेतला आहे.

त्याच पद्धतीने सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या पर्यटकांना पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी नागरोत्थान निधी वाढवून मिळावा यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया असे आवाहन राणे यांनी केले. माजी मंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांनी केलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यातील नगरपरिषदाआणि नगरपंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांना राज्यातील विविध पर्यटन क्षेत्रांचा अभ्यास करण्यासाठी दौऱ्यावर पाठवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. मुख्याधिकाऱ्यांनी केवळ प्रशासकीय कारभार न करता जिल्ह्याच्या पर्यटनात भर पडेल, पर्यटकांची संख्या वाढेल यादृष्टीने नवनवीन संकल्पना, योजना तयार करा अशा सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *