जलसंवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचा सशक्त उपक्रम
मुंबई महानगर प्रदेशात एकंदर ६७ ठिकाणी प्रोजेक्ट अमृतचे आयोजन
कल्याण : संत निरंकारी मिशनच्या वतीने ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या अभियानाच्या चौथ्या टप्प्याचा भव्य शुभारंभ रविवार, २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतभर एकाच वेळी करण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेशात कुलाबा ते भाईंदर, दादर ते मुलुंड व मानखुर्द, ठाणे, नवी मुंबई, उरण, डोंबिवली, कल्याण, बदलापुर, भिवंडी तसेच वसई-विरार आणि पालघर परिसरातील एकंदर ६७ ठिकाणी या प्रोजेक्ट अंतर्गत जलस्रोतांची स्वच्छता करण्यात येणार आहे.
संत निरंकारी मंडळाचे सचिव जोगिंदर सुखीजा यांनी माहिती देताना सांगितले की, हा विशाल उपक्रम देशभरातील १५०० हून अधिक ठिकाणी एकाच वेळी आयोजित केला जाईल. या महामोहिमेचे हे अभूतपूर्व प्रमाण या मोहिमेला ऐतिहासिक स्वरूप देईल, ज्यामुळे जलसंधारण आणि स्वच्छतेचा संदेश अधिक प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचेल.
पाणी हे केवळ एक साधन नसून जीवनाचा आधार आणि ईश्वराची अमूल्य देणगी आहे त्याचे संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे नैतिक कर्तव्य आहे हि जागृती समाजामध्ये निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. संत निरंकारी मिशनने बाबा हरदेव सिंह जी यांच्या प्रेरणादायी शिकवणी आत्मसात करून सन २०२३ मध्ये संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहकार्याने ‘प्रोजेक्ट अमृत’ची सुरुवात केली होती.
नद्या, तलाव, सरोवरे, विहिरी व झरे अशा नैसर्गिक जलस्रोतांच्या संरक्षणासाठी समर्पित या जनआंदोलनाने आपल्या पहिल्या तीन टप्प्यांत सेवा, समर्पण व सहभागाचे उत्कृष्ट उदाहरण निर्माण केले आहे. याच यशामुळे प्रेरित होऊन हा चौथा टप्पा अधिक व्यापक, संघटित व दूरदृष्टीपूर्ण स्वरूपात राबविला जात आहे, ज्यामुळे समाजातील प्रत्येक घटकात निसर्गाबद्दल जागरूकता व सहभागाची सशक्त भावना निर्माण होईल.
मधुर समूह गायन, जनजागृती चर्चासत्रे आणि सोशल मीडिया मोहिमेद्वारे जलजन्य आजार आणि स्वच्छतेचे महत्व अधोरेखित केले जाणार आहे.जेव्हा मन निर्मळ असते तेव्हाच निसर्ग स्वच्छ राहतो, आणि जेव्हा सेवेत समर्पण असते तेव्हा समाजाचे नवनिर्माण होते हे अभियान त्याच संकल्पनेला बळ देणारे आहे.
