नाशिक-पुणे रेल्वे मार्ग, आता लढा विद्यार्थ्यांच्या हाती!
हरिभाऊ लाखे
नाशिक – नाशिक-पुणे जलदगती रेल्वेमार्ग मूळ प्रस्तावित सरळ मार्गाने नेण्यात यावा, यासाठी चाललेल्या लढ्याला जनआंदोलनाचे व्यापक रूप देण्यासाठी विद्यार्थ्यांनी अग्रस्थानी राहण्याची आवश्यकता असल्याकडे लक्ष वेधत नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी तरुण व विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या भावना पत्राद्वारे कळवण्याचे आवाहन केले आहे. संगमनेर व अकोले तालुक्यात ही मोहीम सुरू असून आता तिचा विस्तार सिन्नर तालुक्यातही झाला आहे. सिन्नर रेल्वे कृती समितीने तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसह नागरिकांना लोकशाही मार्गाने आपली भूमिका पत्र मोहिमेतून शासनापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले आहे.
नाशिक–पुणे जलदगती रेल्वे मार्गासाठी नाशिक- सिन्नर– अकोले– संगमनेर– नारायणगाव– राजगुरुनगर– चाकण या मार्गाचे मूळ संरेखन होते. रेल्वे मंत्रालयाने त्यात बदल करून पुणे– अहिल्यानगर– पुणतांबा– साईनगर शिर्डी–नाशिक असा नवीन मार्ग निश्चित केल्यापासून मूळ मार्गावरील गावांमध्ये असंतोष आहे. ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. नाशिक-पुणे जलदगती रेल्वे ही आपल्या हक्काची आहे.
हा हक्क मिळवण्यासाठी आपला संघर्ष अधिकाधिक तीव्र करावा लागेल. ही लढाई एकाच वेळी अनेक माध्यमातून लढावी लागणार आहे, असे आमदार सत्यजीत तांबे यांनी म्हटले आहे. लोकप्रतिनिधी म्हणून विधिमंडळात आपण ही लढाई लढत आहोत. प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा केला जात आहे. यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकजूट करून मुख्यमंत्र्यांकडे हा विषय नेला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या लढ्याला खऱ्या अर्थाने जनआंदोलनाचे रूप देण्यासाठी ज्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा लढा लढला जात आहे, त्या युवकांनी व विद्यार्थ्यांनी पुढे येण्याची गरज आ. तांबे यांनी मांडली. संबंधितांनी पत्राद्वारे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपली भावना कळवण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या आवाहनानुसार संगमनेर व अकोले तालुक्यात ही मोहीम सुरू झाली आहे. आता ही पत्र मोहीम सिन्नर तालुक्यातही राबविली जाणार असल्याचे सिन्नर तालुका रेल्वे कृती समितीचे पदाधिकारी बबन वाजे यांनी सांगितले.
पत्रातून आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवूया, अशी ही मोहीम आहे. या माध्यमातून हा रेल्वे मार्ग बदलल्यास आमच्या भागातील मुलांचे शिक्षण, पालकांचा रोजगार व विकास थांबेल. त्यामुळे भविष्यासाठी मूळ सरळ रेल्वे मार्ग कायम ठेवा, अशी विनंती विद्यार्थ्यांकडून पत्राद्वारे केली जात आहे. रेल्वे मार्ग परिसरातील नागरिकांना पत्र मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आल्याचे वाजे यांनी सांगितले. मार्ग बदलल्यास मूळ मार्गावरील भाग विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर जाईल, तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संधी कमी होतील, शेतकऱ्यांच्या मालास बाजारपेठ मिळणे कठीण होईल, आदींकडे लक्ष वेधले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *