पुणे मार्केट यार्डमधील लिंबू विक्री नियंत्रणाबाबत बैठक
आडतदारांबरोबर मूळ शेतकऱ्याचे हित महत्त्वाचे – अण्णा बनसोडे
मुंबई : गेल्या काही वर्षांपासून पुणे मार्केट यार्ड येथील फळ विभागाऐवजी भाजीपाला विभागात डमी आडत्यांमार्फत लिंबू विक्री सुरू असल्याने फळ विभागातील मूळ लिंबू आडतदारांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर लिंबू विक्री केवळ फळ विभागातच होण्यासाठी बाजार समितीचे धोरण प्रभावीपणे राबविण्याबाबत विधान भवन येथील उपाध्यक्षांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
बैठकीत व्यापारी वर्गाने घेतलेल्या आक्षेपांवर सविस्तर चर्चा झाली. शेतकरी व आडतदारांचे हित लक्षात घेऊन पणन विभागाने योग्य ती अंमलबजावणी करावी, अशा सूचना विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिल्या.
दरम्यान, काही शेतकरी संघटनांनी भाजी बाजारात लिंबू विक्री करण्याची मागणी पणन विभागाकडे केली असल्याने सध्या लिंबू फळबाजारात विक्री होत नसल्याची माहिती पणन विभागाकडून देण्यात आली.
पुणे मार्केट यार्डमधील लिंबू विक्री नियंत्रणाबाबत पुढील आठ दिवसांत पणन मंत्र्यांच्या दालनात बैठक घेऊन या प्रश्नावर तोडगा काढण्यात येईल, असेही अण्णा बनसोडे यांनी स्पष्ट केले. तसेच या बैठकीस व्यापारी संघटनांसोबत शेतकरी प्रतिनिधींनाही उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
विधानभवनातील या बैठकीस सहकारी संस्था पुणे ग्रामीणचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप, पणन विभागाच्या अवर सचिव माधवी शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रतिनिधी राजाराम धोंडकर, सभापती प्रकाश जगताप तसेच अर्जदार उपस्थित होते.
