पूजन आराध्यदेवतेचे
आपल्याकडे शिव ही अनेकांची आराध्यदेवता आहे. आपल्याकडे त्रिमूर्ती म्हणतात त्यात ब्रम्हा सृष्टीकर्ता, विष्णू पालनकर्ता आणि शिव हा संहारक अशी माहिती येते पण पुराणाच्या आधीदेखील वेदवाड्मयामध्ये शिवाचा उल्लेख रुद्र म्हणून आला आहे. तोही विचारात घ्यायला हवा. यावरुनच आपल्याला शिवाची प्राचीनता समजू शकेल. शिव दोन प्रकारांमध्ये पूजला जातो. एक म्हणजे शिवलग आणि दुसरं म्हणजे शिवाची मूर्ती. आपण शिवलगाला पड असंही म्हणतो. ‘पडी ते ब्रह्मांडी’ अशी एक म्हण आपल्याकडे ऐकायला मिळते. याचा अर्थच शिव हा ब्रह्मांड व्यापून टाकणारा देव आहे असा होतो. खरं तर सर्वार्थाने शिवाची महती आपल्या लक्षात आलेली नाही. भक्ताच्या एका हाकेला ‘ओ’ देणाऱ्या या देवतेचे आशिष मिळणे म्हणजे इहलोकी सुखी होऊन पैलतिराचा मार्ग श्रेयस्कर होणे. चिताभस्म अंगी फासून एकांतात राहणाऱ्या या देवतेची उपासना तितकीच साधी. बिल्वपत्र अर्पण करुनही ही पूजा संपन्न होते. आपण सर्वांनीच शिवलगावर म्हातारीच्या दुधाच्या अभिषेकाची कथा ऐकली आहे. म्हणजेच एकीकडे ही देवता उग्र आहे, कोपिष्ट आहे, संहारक आहे, संताप अनावर झाल्यास तांडव करुन चराचर हलवून सोडणारी आहे, तिसरा डोळा उघडून हाहाकार माजवणारी आहे, पण तितकीच कनवाळूही आहे. भक्ताची अडचण ओळखणारी आहे. या देवतेची उपासना भक्ताला आश्वस्त करते. मानसिक समाधान मिळवून देते. विशेष म्हणजे ती प्रतिकूल परिस्थितीत मार्गक्रमणा करण्याची प्रेरणा देते. म्हणूनच शिवउपासना ही सर्वश्रेष्ठ उपासना आहे.
माघ महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीला ‘महाशिवरात्री’ म्हणतात. त्या दिवशी भाविक नदीमध्ये स्नान करून शिवलगावर रूद्राभिषेक करतात. भक्तीपूर्वक पूजा करून एक लक्ष एक हजार कवा 108 बिल्वपत्र वाहतात. शिवाय सर्वच भाविक त्या दिवशी दिवसभर उपवास करून शिवभजनात रममाण होतात. रात्री जागरण करून शिवाचे भजन-कीर्तन केले जाते. श्री भगवान शंकराचे नाव घेताच व्याघ्रचर्म अंगावर लेवून कैलास पर्वतावर तपश्चर्येला बसलेल्या शिवाचे रूप समोर येते. गळ्यात रूद्राक्षांच्या माळा, त्याभोवती विळखा घालून बसलेले मोठाले नाग, हाती त्रिशूळ, माथ्यावर चंद्र आणि जटांमध्ये गंगा असे स्तिमित करणारे भगवान शंकराचे रूप डोळ्यासमोर येते. उग्र तरीही भयभीत न करता नतमस्तक व्हायला लावणारे ते दिव्य रूप शंकराचे वेगळेपण दाखवते. महापराक्रमी, उग्र दिसणारा, अत्यंत रागीट परंतु तितकाच दयाळू आणि भोळाभाबडा म्हणून भक्तांच्या हाकेला चटकन धावून जाणारा, संकट निवारण करणारा हा देव भक्तांना परमप्रिय आहे. महापराक्रमी, शक्तीमान अशा शंकराच्या पराक्रमाच्या अनेक कथा पुराणात प्रसिद्ध आहेत. परंतु, या देवाचे एकूणच आयुष्य हे इतर देवांपेक्षा खूप वेगळे आहे. ते कोणत्याही वैभवशाली सोन्याच्या, रत्नजडीत महालात न राहता विराण अशा कैलास पर्वतावर राहतात. दाग-दागिन्यांचा, उंची वस्त्रांचा मोह त्यांना अजिबात नाही. कैलास पर्वतावर एकांतात राहून त्यांनी वैराग्य जवळ केले आणि बैरागी असे प्रेमाचे संबोधन मिळवले. तरीही जगापासून दूर राहून सर्व विश्वावर त्यांचे राज्य आहे आणि त्याचा सांभाळ करण्याची जबाबदारीही ते पार पाडतात.
आज माणसानेही या गोष्टींचा विचार करायला हवा. विशेषत: आजच्या आयुष्यात अती हव्यासापायी अतोनात जीवघेणी स्पर्धा, धावण्याचा वेग माणसाच्या आयुष्याला आला आहे; तो त्याने स्वत:च निर्माण केला आहे आणि त्यामुळे तो स्वत:च किती तरी हैराण झाला आहे. वास्तविक सुखी जीवन जगण्यासाठी माणसाला मनाची शांतता, ध्यान, तपश्चर्या, निसर्गातील मोकळी हवा आणि कुटुंबियांचं प्रेम एवढ्या गोष्टी पुरेशा असतात. पैशाची गरज हा महत्त्वाचा भाग असला तरी त्याच्य प्राप्तीची अतिशयोक्ती हा मात्र आपणच निर्माण केलेला त्रास आहे. आयुष्यात कोणतेही सुखोपभोग न घेता कर्तव्य पार पाडण्याचा आदर्श म्हणजे श्री भगवान शंकरांचं आयुष्य. भगवान शंकर पराक्रमी परंतु अत्यंत भोळेभाबडे होते अशा आशयाच्या कथा पुराणात प्रसिद्ध आहेत. एकदा म्हणे शंकरांनी खुद्द पार्वतीच एका राक्षसाला देऊन टाकली. कारण पार्वतीच्या रूपावर भाळून त्या राक्षसाने उग्र तपश्चर्या करून शंकर देवांजवळ त्यांच्या पत्नीलाच मागून घेतले. त्यावेळीसुद्धा व्यवहारचतुर श्रीकृष्णाने पार्वतीला कुरूप स्त्रीचे रूप घेण्याची युक्ती देऊन राक्षसापासून सुटका करुन घेतली. अशा भोळ्याभाबड्या शंकराच्या कथा ऐकून वाटते की पराक्रमी असले तरी इतके भोळेभाबडे असूनही चालत नाही. जगात वावरताना सतत जागरूकपणा आणि व्यवहारचातुर्य प्रत्येकाजवळ असायलाच हवे; अन्यथा लबाड लोक गैरफायदा घेतात आणि नसत्या संकटांनाही तोंड द्यावे लागते. आजच्या काळालाही ही बाब विशेष लागू आहे हे महाशिवरात्रीच्या निमित्ताने जाणवते.
हा भोळाभाबडा शंकर महान शक्तीशाली असल्यामुळे पार्वतीला पती म्हणून मनापासून पसंत पडला. त्यासाठी ती सारे राजवैभव सोडून आली. या बैराग्याला पतीरूपात प्राप्त करून घेण्यासाठी तिने उग्र तपश्चर्या केली. एखादी अप्राप्य गोष्ट किती घोर तपश्चर्येने प्राप्त करून घेता येते त्याचेच हे उदाहरण म्हणता येईल. पतीवरचे अपार प्रेम, श्रद्धा याचे उत्तम उदाहरण म्हणजे पार्वतीचे आयुष्य. माहेरचे राजवैभव सोडून ऊन, पाऊस, वारा याची पर्वा न करता कैलास पर्वतावर पतीसमवेत अर्धांगिनी होऊन राहून तिने आपले पत्नीपद देवत्वाला नेले. आपल्या पतीच्या पराक्रमाचा, वैराग्य जीवनाचा, शिष्यगणांचाही तिला सार्थ अभिमान होता. आजच्या काळात शंकर-पार्वतीच्या या अतूट प्रेमाचा आदर्श प्रत्येक पती-पत्नीसमोर आहे. पती-पत्नीमध्ये मनोमीलन होऊन प्रेमाचे अद्वैत निर्माण व्हावे ते असे. आजच नव्हे, तर युगानुयुगे पती-पत्नी अद्वैताचे हे दिव्य रूप माणसांपुढे राहील. आजच्या धावपळीच्या युगात एक लक्ष बिल्वपत्र वाहणे प्रत्येकाला शक्य नसले तरी भक्तीभावाने शंकराची आठवण करून हात जोडले तरी ती सेवासुद्धा भोळ्या शिवाला प्रसन्न करेल. अगोदर आपले संसारातले सारे कर्तव्य पार पाडा आणि मगच माझे पूजन करा असा संदेश ‘खुलभर दुधा’च्या कहाणीद्वारे भगवानांनी दिला आहे. असा हा उग्र, वैरागी, वेगळ्या मनोवृत्तीचा परमेश्वर अत्यंत कलाप्रिय आणि रसिक आहे. भगवान शंकरांचे तांडव नृत्य हा नृत्यप्रकारही लोकप्रिय आहे. सादर करण्यास अवघड आणि शक्ती पणाला लावणारा हा नृत्यप्रकार भगवान शंकर पार्वतीसह लिलया सादर करत. महाशिवरात्रीच्या निमित्ताने अशा या भगवान शंकरांना महाप्रणाम!
(अद्वैत फीचर्स)
