भाषा गौरव दिनानिमित्त ‘चित्रउत्सव अभिजात मराठीचा’
‘सुंदरा’ फेम मीना नेरुरकर यांचा कलाश्रमच्या उपक्रमात सहभाग

अभिनेते राजा परांजपे यांना अभियान सन्मान पुष्पात नृत्यांजली अर्पण
‘कलाश्रम’ या संस्थेच्या वतीने प्रत्येक महिन्याला ‘अभियान सन्मान’ हा उपक्रम राबवला जातो. यंदा या फेब्रुवारी महिन्यात होणारे हे ७४ वे पुष्प आहे. स्वातंत्र्यसैनिक डॉ. पशुराम पाटील कला केंद्राच्या अंतर्गत ही संस्था कार्य करते. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम डॉ. मीना नेरुरकर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अभिनेत्री, लेखिका, दिग्दर्शिका, नृत्यांगना, नृत्यदिग्दर्शिका अशी त्यांची ओळख आहे. शुक्रवार, २७ मार्च ‘मराठी भाषा गौरव दिनी’ सायंकाळी ४ वाजता. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रवींद्र नाट्य मंदिर चौथा मजला, चित्रकला दालन, प्रभादेवी येथे हा कार्यक्रम होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात दिवंगत झालेल्या प्रज्ञावंतांचे स्मरण आणि तसे कार्य करणाऱ्या गुणीजनांना ‘दखलपत्र’ देऊन त्यांचा सन्मान करणारा हा उपक्रम असतो. नटवर्य प्रभाकर पणशीकर यांची पत्नी आणि नाट्यसंपदा संस्थेचे व्यवस्थापन जबाबदारी स्वीकारणाऱ्या दिवंगत विजया पणशीकर, चित्रकार, सजावटकार वसंत तोडणकर, वृत्त निवेदक, लेखक अनंत भावे या दिवंगतांचे स्मरण यावेळी केले जाणार आहे. यांच्या नावाचे ‘दखलपत्र’ सुप्रिया प्रोडक्शन या नाट्यसंस्थेला गती देणाऱ्या अनिता चव्हाण, चित्रकार, सजावटकार प्रकाश लहाने, वृत निवेदक, पत्रकार विशाल पाटील, ज्या गिरणी कामगार पुत्राने कलेच्या प्रांतात यश मिळवले आहे. त्यांना ‘अव्वल पुरस्कार’ देऊन गौरवांकित करण्यात येते. रोख रक्कम, दखलपत्र असे त्याचे स्वरूप असते. दिवंगत आदर्श श्रमिक पांडुरंग परब, आदर्श गृहिणी रुक्मिणी परब यांच्या नावाचा हा मान यंदा रंगभूषा, प्रकाश योजना, नेपथ्यकार सुनील देवळेकर यांना प्राप्त झालेला आहे. परब यांचे सुपुत्र, ज्येष्ठ रंगकर्मी अशोक परब यांचे मार्गदर्शन या पुरस्काराला लाभलेले आहे. प्रत्येक महिन्याला महाराष्ट्राचे नाव उज्वल करणाऱ्या प्रज्ञावंतांना प्रत्यक्ष कलाकृती सादर करून आदरांजली वाहिली जाते. लेखक, दिग्दर्शक, अभिनेते राजा परांजपे यांना निवृत्त पोलीस अधिकारी, गायक हरिश्चंद्र ठोंबरे आणि नृत्यांगना अनघा देसाई ‘बाई मी विकत घेतला शाम’ या गाण्यावरती भावमुद्रा सादर करून नृत्यांजली अर्पण करणार आहेत. २७ फेब्रुवारी ‘मराठी भाषा गौरव दिन’चे निमित्त घेऊन संस्थेने ‘चित्रउत्सव अभिजात मराठीचा’ या ६७ व्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. चित्रपट निर्माते, पर्यावरण तज्ञ, संपादक डॉ. किशोर भोईर यांच्या स्मृतिदिनाचे निमित्त घेऊन ही स्पर्धा आयोजित केली आहे. डॉ. कामिनीदेवी भोईर यांचे मार्गदर्शन या स्पर्धेला लाभले आहे. लेखक, दिग्दर्शक, निर्माते सतीश रणदिवे हे या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहत आहेत. त्याचा पारितोषिक वितरण समारंभ यावेळी होणार आहे. ज्योती शिंदे, शेजल जाधव, मानसी धारप, रोहन वानखेडे, सुजाता गोलटकर, सलोनी बोरकर, मृण्मयी मोडक आदींचा या कार्यक्रमामध्ये सहभाग आहे. नंदकुमार पाटील हे या संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष आहेत तर नंदिनी पाटील या संचालिका आहेत.
