माथेरान मध्ये एवढ्या महागड्या शौचालयांची आवश्यकता आहे का ?
मुकुंद रांजणे
माथेरान : प्रशासकीय राजवटीत माथेरान मध्ये जवळपास दहा शौचालये आणण्यात आली आहेत. स्त्री आणि पुरुषांच्या करिता वेगवेगळ्या स्वरूपात असणाऱ्या या शौचालयांची किंमत अडतीस लाख रुपये प्रति असून एवढ्या महागड्या शौचालयांची खरोखरच या दुर्गम भागातील पर्यटनस्थळावर आहे का? असा प्रश्न स्थानिकांमधून उपस्थित केला जात आहे. यातील एक शौचालय नगरपरिषदेच्या आवारात याठिकाणी अगोदरच दोन शौचालय असताना देखील नाहक एवढी महागडी शौचालय खासकरून अधिकारी आणि कर्मचारी वर्गासाठी बसविण्यात आले आहे.
तर काही शौचालये अद्यापही नगरपरिषदेच्या आवारात धूळ खात पडून आहेत. माथेरान मध्ये आजमितीला खर्चिक पर्यटकांचा भरणा होत नाही. पर्यटन कशाप्रकारे वाढेल इथे पर्यटन वाढीसाठी वाहतूक व्यवस्था त्याचप्रमाणे सुस्थितीत रस्ते असावेत, पाणी, वीज सुविधा उत्तम प्रकारे उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. परंतु प्रशासकीय राजवटीत माथेरान पुढील काही वर्षे पिछाडीवर गेल्याचे बोलले जात आहे. नगरपरिषदेच्या तिजोरीत खळखळाट असून कामगारांना त्याचप्रमाणे लहानसहान कामे करणा-या  ठेकेदाराला वेळेवर पगार,बिले  मिळत नसल्याच्या तक्रारी येत असतात. एखादया निकृष्ट कामांबाबत केलेल्या कामांची बिले किती अदा केली आहेत याबाबत कुणी माहितीच्या अधिकारात माहिती मागविल्यास मोगम उत्तरे देऊन कामात चालढकल सुरू असते.मोठया कामातील ठेकेदाराला शुल्लक रक्कमेसाठी अभय दिले जात असून पाठिशी घातले जात आहे. आजवर इथल्या विकास कामांबाबत सकारात्मक कामे न होता सुध्दा लाखो,करोडो रुपयांची बिले अदा करण्यात आलेली आहेत यामागे कुणाचा  वरदहस्त आहे. प्रशासकीय राजवटीत मोठया प्रमाणावर अनाठायी खर्च आणि भ्रष्टाचार झाल्याचे नागरिक बोलत आहेत.एकंदरीत माथेरान नगरपरिषदेच्या अनागोंदी  कारभार बाबतीत संबंधित अधिकारी, कर्मचारी यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई बरोबरच दोषी असणाऱ्या या  मंडळींना सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *