वरळीतील झोपडीधारकांचा एसआरए विरोधात एल्गार
रहिवाशांच्या मोर्चाची घेतली दखल प्रकल्प रखडविणाऱ्या विकासकावर होणार कारवाई – शैलेंद्र कांबळे
अनिल ठाणेकर
मुंबई, वरळी नाका परिसरातील प्रेम नगर व सिद्धार्थ नगर येथील इंदिरा झोपडपट्टी पुनर्वसन (एसआरए) प्रकल्प सुमारे २५ वर्षांपासून रखडला आहे. याविरोधात मार्क्र्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि बहुजन शक्ती संघटनेच्या वतीने  रहिवाशांनी आज एसआरए कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी मोर्च्याच्या शिष्टमंडळाला प्रकल्प रखडविणाऱ्या विकासकावर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले, अशी माहिती शैलेंद्र कांबळे यांनी दिली. यावळी मनोज यादव, तृप्ती निकाळजे, प्रविण मांजळकर, अशोक पवार,बहुजन शक्तीचे सुधाकर रणखांबे, संतोषी शिरोडकर, कलप्पा न्हावी,नवाज शेख, विशाल कांबळे, संजय मकासरे आदी उपस्थित होते.
मोर्चानंतर शिष्टमंडळाने प्रशासनाकडे निवेदन सादर करत बैठकीत विकासकाच्या निष्क्रियतेबाबत तक्रार नोंदवली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे विशेष अधिकारी मजगे यांनी प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल तसेच प्रकल्प रखडविणाऱ्या विकासकाविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.दरम्यान, ५७ रहिवाशांना विकासकाने भाडे न दिल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला. याबाबत सहाय्यक निबंधक चंद्रकांत पवार यांनी सांगितले की, यापूर्वी विकासकाला नोटीस बजावण्यात आली होती. विकासकाने भाडे देण्याचे कबूल करत धनादेश दिला; मात्र तो बाऊन्स झाल्याची माहिती देण्यात आली. तरीही अद्याप ठोस कारवाई न झाल्याने रहिवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.प्रकल्पासाठी निश्चित कालमर्यादा जाहीर करून ती सार्वजनिक करावी, तसेच अपयशी विकासकाची नियुक्ती रद्द करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास पुढील तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही रहिवाशांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *