मुंबई : महापालिका निवडणुकीतील कडूगोड आठवणी बाजूला सारत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी शिंदेंचे ठाण्यातील घर नंदनवन गाठले. राज ठाकरे नंदनवनात आल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.

एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे या दोन्ही नेत्यांत सुमारे २० ते २५ मिनिटे चर्चा झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, मनसेच्या पाठिंब्याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी राज ठाकरे यांचे आभार मानले. तसेच, महापालिका सभागृहातील कामकाजात मनसेचे सहकार्य राहील, असे आश्वासन राज ठाकरे यांनी दिल्याचे बोलले जाते. त्यामुळे या भेटीत केडीएमसीसह इतर राजकीय घडामोडींवरही चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत शिंदे यांच्या शिवसेनेने सर्वाधिक जागा जिंकल्या. मनसेला अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र, महापौर निवडीवेळी मनसेच्या नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष असताना, मनसेचा हा पाठिंबा चर्चेचा विषय ठरला होता.

दरम्यान, या भेटीवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली. “एकनाथ शिंदे आमचे विरोधी नेते असले तरी ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. तसेच राज ठाकरे मनसेचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांनी कोणाला भेटावे किंवा न भेटावे, यावर आम्ही भाष्य करू शकत नाही. या भेटीत आक्षेपार्ह असे काही नाही,” असे त्या म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *