मुंबई : तब्बल २३ वर्षांच्या प्रदिर्घ सेवेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी अॅक्सिस बँकेतील आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. यासंदर्भातील माहिती त्यांनी स्वतः सोशल मीडिया पोस्ट करून दिली.
अमृता फडणवीस यांनी जवळपास २३ वर्षे बँकिंग क्षेत्रात काम केले आहे. व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी म्हणून अॅक्सिस बँकेत रुजू झाल्यानंतर त्यांनी शाखा कामकाज, कॉर्पोरेट बँकिंग, ट्रेझरी तसेच ग्राहक संबंध व्यवस्थापन अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. अखेर वरिष्ठ उपाध्यक्ष पदावर असताना त्यांनी स्वेच्छेने नोकरीचा राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले आहे.
राजीनाम्याबाबतच्या पोस्टमध्ये अमृता फडणवीस यांनी लिहिले आहे की, “२३ वर्षांपूर्वी व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी म्हणून अॅक्सिस बँकेत प्रवेश केला. आज वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून माझ्या पदाचा राजीनामा देताना मन कृतज्ञतेने भरून आले आहे. या प्रवासात मिळालेला अनुभव, सहकारी, वरिष्ठ अधिकारी—विशेषतः एमडी आणि सीईओ अमिताभ चौधरी यांचे मार्गदर्शन—हे माझ्यासाठी मोलाचे ठरले. अॅक्सिस बँक माझ्यासाठी केवळ संस्था नव्हे, तर एक कुटुंब आणि दुसरे घर राहिले आहे.”
या पोस्टमध्ये त्यांनी पुढील आयुष्यातील प्रवासाबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त करत, “हा एक सुंदर अध्याय इथे संपतो आहे. आता आयुष्यभराचे धडे आणि आठवणी घेऊन पुढील वाटचाल करणार आहे,” असे नमूद केले.
