उल्हासनगरात टँकर पॉईंट येथील पिण्याच्या पाण्याचा गटारीचे चेंबर साफ करण्यासाठी वापर
उल्हासनगर : एकीकडे उल्हासनगर शहरात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या नागरिकांना भेडसावत असताना दुसरीकडे टँकर पॉइंट येथील पिण्याच्या पाण्याचा वापर मलनिःसारण सफाईच्या गाडीमधून पिण्याचे पाणी भरून ते चक्क गटारीचे चेंबर साफ करण्यासाठी वापरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार ॲड प्रशांत चंदनशिव यांनी उघडकीस आणून याबाबत अभियंता पालिका आयुक्त व पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना तक्रार केली आहे.
ॲड प्रशांत चंदनशिव यांनी सांगितले उल्हासनगर शहरातील पूर्व परिसरातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये दसरा मैदान जवळ टँकर पॉईंट आहे. शहरात ज्या ठिकाणी सुरळीत पाणीपुरवठा होत नाही अशा ठिकाणी या टँकर पॉइंटवरून पिण्याचे पाणी टँकर मध्ये भरून त्या परिसरातील नागरिकांना पुरवले जाते. पण १८ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १ च्या सुमारास ॲड प्रशांत चंदनशिव हे त्या ठिकाणाहून जात असताना त्या टँकर पॉईंट इथे मलनिःसारण सफाईची गाडी उभी होती. टँकर पॉईंट वरील पिण्याचे पाणी त्या गाडीत भरत असताना दिसून आले. ते पाणी गटारीचे चेंबर साफ करण्यासाठी वापरले जात असल्याचे त्यांना चौकशीत समजले. एकीकडे शहरात काही परिसरात पाण्याची भीषण टंचाई. तर काही ठिकाणी सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने. तर काही भागात कमी दबावाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे नागरिकांच्या हक्काचे हे टँकर पॉईंट मधील पाणी मलनिःसारण सफाई करण्याकरिता वापरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार शहरात घडत असताना याकडे संबंधित अधिकाऱ्याचे व पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष केले जात असल्याचे ॲड प्रशांत चंदनशिव यांनी सांगितले
या घटनेबाबत ॲड प्रशांत चंदनशिव यांनी तक्रार करण्यासाठी उल्हासनगरातील कॅम्प नंबर ५ येथील उपविभागीय कार्यालय मध्ये गेले असता अभियंता मिरकुटे यांना या घटनेबाबत त्यांनी तक्रार केली. तसेच पालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांना ई-मेल द्वारे तक्रार करून पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना देखील तक्रार केली आहे. आताही अधिकारी मंडळी या घटनेबाबत कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *