जेफ्री एपस्टीन प्रकरणात केली अटक ० लहान मुलींच्या लैंगिक शोषणप्रकरणी अटक

इंग्लंड बाल लैंगिक शोषणाच्या विकृतीचा मास्टरमाईंड जेफ्री एपस्टीन याच्याशी कथित संबंधांच्या पार्श्वभूमीवर ब्रिटिश राजघराण्याचे सदस्य राजपुत्र अँड्र्यू यांना लंडनमध्ये ब्रिटिश पोलिस यांनी अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे. अँड्र्यू हे राजे चार्ल्स तिसरे यांचे धाकटे बंधू असून या कारवाईमुळे ब्रिटिश राजघराण्यात मोठी खळबळ उडाली आहे. एपस्टिन प्रकरणात नाव आल्याने नुकतेच त्यांचा राजपुत्र हा किताब काढून घेण्यात आला होता.

भारतातही केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी आणि उद्योजक अनिल अंबानी यांची नावे या एपस्टिन फाईलमध्ये आली आहेत. केंद्र सरकाराने त्यांच्यावर कारवाई करावी अशी विरोधकांची जोरदार मागणी आहे.

एपस्टीन प्रकरणात अनेक आंतरराष्ट्रीय राजकीय नेते आणि धनाढ्य व्यक्तींची नावे चर्चेत असतानाही, राजघराण्यातील एखाद्या वरिष्ठ व्यक्तीची अटक होण्याची ही पहिलीच ठळक घटना मानली जात आहे. याआधी अँड्र्यू यांच्यावर सार्वजनिक पातळीवर राहून एपस्टीनसारख्या गुन्हेगाराशी संबंध ठेवल्याचे आरोप झाले होते. लंडनच्या थेम्स व्हॅली पोलिसांनी दिलेल्या निवेदनात अँड्र्यू यांचे नाव थेट न घेता, नॉरफोक येथील ६५ वर्षीय व्यक्तीस अटक झाल्याचे सांगण्यात आले. तसेच त्यांच्या काही निवासस्थानी छापे टाकल्याची माहितीही समोर आली आहे.

एपस्टीनकडून सरकारी गोपनीय कागदपत्रे व माहिती मिळाल्याचा आणि त्या बदल्यात कथित गैरप्रकार झाल्याचा आरोप अँड्र्यू यांच्यावर आहे. अमेरिकेत एपस्टीनच्या गैरवर्तनांबाबत हजारो फाइल्स सार्वजनिक झाल्यानंतर त्यात अँड्र्यू यांचे नाव वारंवार आल्याने ब्रिटिश सरकारवरही दबाव वाढला होता.

दरम्यान, नुकतीच राजपुत्र’ ही उपाधी आणि अधिकृत निवासस्थान अँड्र्यू यांच्याकडून काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या वेळी बकिंगहॅम पॅलेसकडून “सार्वजनिक पदावर असलेल्या व्यक्तींविषयी असे आरोप होणे योग्य नाही” अशी भूमिका मांडण्यात आली होती.

या अटकेवर प्रतिक्रिया देताना राजे चार्ल्स तिसरे यांनी निवेदनात सांगितले की, “कायद्याप्रमाणे चौकशी होईल. कोणालाही विशेष सवलत दिली जाणार नाही.” ही बाब त्यांनी थेट नागरिकांशी संवाद साधत स्पष्ट केली.

शिक्षा काय होऊ शकते?
कायदेतज्ज्ञांच्या मते, आरोप सिद्ध होण्यासाठी ठोस पुरावे आवश्यक आहेत. सध्या आरोपांचे स्वरूप आणि उपलब्ध कागदपत्रांवरून नेमकी शिक्षा काय होईल, हे सांगणे कठीण आहे. अँड्र्यू यांनी यापूर्वी सर्व आरोप फेटाळले असले तरी, चौकशीची दिशा आणि आंतरराष्ट्रीय दबाव लक्षात घेता पुढील काळात प्रकरण अधिक गंभीर वळण घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एपस्टीन प्रकरणामुळे केवळ राजघराणेच नव्हे, तर ब्रिटिश सरकारवरही दबाव वाढला असून येत्या दिवसांत या प्रकरणातील घडामोडींवर जगाचे लक्ष राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *