जिल्हा परिषद ठाणे कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
अनिल ठाणेकर
ठाणे : १९ फेब्रुवारी रोजी टीएमसी पार्किंग प्लाझा, ८ वा मजला, लक्ष्मी नगर, ज्युपिटर हॉस्पिटलजवळ येथील प्रकल्प संचालक कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व अभिमानाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही पुष्पांजली अर्पण करून शिवरायांना विनम्र अभिवादन केले.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आढावा घेत कर्मचाऱ्यांना कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा व लोकाभिमुख प्रशासनाची जाणीव ठेवण्याचे आवाहन केले. शिवरायांच्या राष्ट्रप्रेम, धैर्य आणि संघटन कौशल्यातून प्रेरणा घेऊन विकासकामे अधिक परिणामकारकपणे पूर्ण करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र) अविनाश फडतरे यांनी आपल्या मनोगतात शिवरायांच्या शौर्य, दूरदृष्टी, सुशासन व लोककल्याणकारी धोरणांचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, शिवरायांचे स्वराज्य हे न्याय, समता व पारदर्शक प्रशासनाचे प्रतीक होते. त्यांच्या आदर्शांवर चालत शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविणे व जनतेच्या सेवेस तत्पर राहणे हीच खरी शिवजयंती साजरी करण्याची भावना आहे. या कार्यक्रमास सहाय्यक प्रकल्प अधिकारी आरती गगे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी हर्षद मोरे, विस्तार अधिकारी (सा) संतोष पांडे, वरिष्ठ सहाय्यक नारायण उंबरगोंडे, कनिष्ठ सहाय्यक विशाल कोदर्लीकर, डेटा ऑपरेटर तुषार वाणी तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *