तुर्भे विभागामार्फत अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई
नवी मुंबई महानगरपालिकाच्या अतिक्रमण विभागामार्फत तुर्भे विभागात अनधिकृत बांधकामाविरुद्ध तोडक कारवाई करण्यात आली. ही कारवाई आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त (२) डॉ. राहुल गेठे आणि उपआयुक्त (अतिक्रमण) डॉ. कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
तुर्भे विभागाअंतर्गत सेक्टर १, सानपाडा येथील भु. क्र. २३, २४, ४६ ते ५० या ठिकाणी मे. शिवशंकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या शॉप नं. ६, ७ आणि ८ येथे प्रत्यक्ष स्थळपाहणी करण्यात आली. पाहणीदरम्यान तळमजल्यावरील स्कूटर पार्किंगच्या जागेत विनापरवानगी अनधिकृत बांधकाम करून वाणिज्य वापर सुरू असल्याचे निदर्शनास आले.
शॉप नं. ६ – ३.६५ मी. x २.०० मी. क्षेत्रफळ
शॉप नं. ७ – ३.५० मी. x २.०० मी. क्षेत्रफळ
शॉप नं. ८ – ३.५० मी. x २.०० मी. क्षेत्रफळ
सदर अनधिकृत बांधकामास महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६च्या कलम ५३(१) अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, नोटीस देऊनही वाणिज्य वापर सुरूच ठेवण्यात आल्याने तोडक कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली.
महापालिकेच्या पथकाने संबंधित बांधकाम निष्कासित केले. ही कारवाई सहाय्यक आयुक्त (तुर्भे) सागर मोरे यांच्या नियंत्रणाखाली कनिष्ठ अभियंता विनोद आंब्रे तसेच अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. मोहिमेसाठी अतिक्रमण निर्मूलन पथकातील पोलीस अधिकारी/अंमलदार व सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले होते. कारवाईदरम्यान १ इलेक्ट्रिकल हॅमर, १ गॅस कटर आणि ८ मजूर यांचा वापर करण्यात आला. यापुढेही अशा प्रकारच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *