पुनर्वसनाचे धोरण ठरल्याशिवाय निष्कासन करू नये : वर्षा गायकवाड
मुंबई : बर्मा शेल रेल्वे लाईन लगतच्या राजीव गांधी नगर, इंदिरा नगर, सुमन नगर आणि चिखलवाडी येथील झोपडीधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. राज्य शासनाच्या विहित धोरणानुसार पात्र रहिवाशांचे पुनर्वसन निश्चित होईपर्यंत कोणतीही निष्कासन कारवाई करू नये, अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
मुंबई काँग्रेस अध्यक्षा असलेल्या खासदार गायकवाड यांनी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे तसेच रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवून हा मुद्दा उपस्थित केला आहे.
पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, २०१९ मध्ये बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण झाले असून २०२२ मध्ये रहिवाशांनी आवश्यक कागदपत्रे सादर केली आहेत. मात्र, पात्रतेबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. उलट, २०२३ पासून येथील नागरिकांना सातत्याने निष्कासनाच्या नोटिसा बजावल्या जात असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर रेल्वे अधिकारी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) आणि जिल्हाधिकारी यांची संयुक्त बैठक बोलावून पुनर्वसनाचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करावा, जेणेकरून कोणावरही अन्याय होणार नाही, अशी मागणीही वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
पुनर्वसनाचे स्पष्ट धोरण निश्चित होईपर्यंत कोणतीही कारवाई स्थगित ठेवावी, असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे.
