भांडुपमधून पोर्ट ट्रस्ट कामगाराचा मुलगा दीपक सावंत झाला नगरसेवक
अनिल ठाणेकर
मुंबई, मुंबई महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भांडुप गावातील प्रभाग क्रमांक १११ मधून मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सीएमई विभागातून जून १९९१ साली सेवानिवृत्त झालेले राजाराम विष्णू (सावंत ) देसाई, चार्जमन, लोको शेड यांचा मुलगा दीपक सावंत हा शिवसेना ( उबाठा ) पक्षातून नगरसेवक म्हणून निवडून आला आहे. पोर्ट ट्रस्ट कामगाराचा मुलगा दीपक सावंत नगरसेवक झाला म्हणून त्यांचे मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे, अशी माहिती कामगार नेते मारुती विश्वासराव यांनी दिली
साधारण ३२ वर्षांपूर्वी दीपक सावंत यांना शिवाजी नगर, शिवडी, मुंबई पोर्ट ट्रस्ट कॉलनी वडाळा या प्रभागातून शिवसेनेची उमेदवारी नक्की झाली होती. पक्षाचा AB अर्ज मिळाला होता. त्यामुळे पोर्ट ट्रस्ट वसाहतीमधील रहिवाशांना खूप आनंद झाला. कॉलनीत मिरवणूक, फटाके, ढोल ताशे वाजू लागले. पोर्ट ट्रस्ट कॉलनी मध्ये आनंद पसरला. पोर्ट ट्रस्ट कर्मचाऱ्याच्या मुलाला उमेदवारी मिळाली म्हणून घराघरात आनंद झाला.घराघरातून ओवाळणी झाली. फुलांच्या अक्षता पडल्या. परंतु हा आनंद रहिवाशांना जास्त मिळाला नाही. पक्षात चक्र फिरली. की फिरवली. दुसऱ्या दिवशी उमेदवारी फिरवली गेली. संपूर्ण वसाहत शोक सागरात बुडाली. जणू काही सुतक पडले. परंतु दीपक सावंत शांत होता. त्याने सगळ्यांना शांत केले. संधी हुकली. परंतु तो निष्ठेने शिवसेनेचे काम करत राहिला. दीपक सावंतचे वडील राजाराम सावंत मुंबई पोर्ट ट्रस्ट मधून १९९१ साली निवृत्त झाले. ते वसाहत सोडुन भांडुप गावात स्थायिक झाले. दीपक सावंत नोकरी बघून शाखेचे काम प्रामाणिक पणे आजतागायत करत आला. भांडुप गावचा तो शिवसैनिक झाला. दरम्यान संघटनेवर अनेक संकटे आली. परंतु दीपक सावंत निष्ठेने कम करत होता. आणि एवढ्या वर्षांनी पक्षाने परत संधी दिली आणि मुंबई महानगर पालिका निवडणुकीत भांडुप गावातून पोर्ट ट्रस्ट कामगाराचा मुलगा दीपक सावंत नगरसेवक झाला.
