मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरही कस्टम विभागाने मोठी कारवाई करत कोट्यवधिचं साहित्य जप्त केलं आहे. हिरे, सोनेसह कोट्यावधींचे अंमली पदार्थही जप्त करण्यात आले आहे.याप्रकरणी, ८ जणांना अटकही करण्यात आलीय.
मुंबई कस्टम झोन – ३ (एअरपोर्ट) यांनी मोठी कारवाई करत विविध प्रकरणांत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ, हिरे, सोने आणि परकीय चलन जप्त केले आहे. या कारवाईत एकूण ८ प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. कस्टम्सकडून मिळालेल्या माहितीनुसार, कारवाई जवळपास १६.७ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ, ३८ लाख रुपयांचे हिरे, १५ लाख रुपयांचं सोनं आणि विविध प्रकरणात १.१३ कोटी रुपयांचे परकीय चलन असा मोठा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
सुमारे १६.७५६ किलो संशयित एनडीपीएस (हायड्रोपोनिक वीड) जप्त करण्यात आले असून त्याची अंदाजे किंमत १६.७५६ कोटी इतकी आहे. तसेच २४६.७५ कॅरेट नैसर्गिक व लॅब-ग्रोउन हिरे जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत सुमारे ३८.२८ लाख आहे.
याशिवाय १०४ ग्रॅम २४ कॅरेट सोने जप्त करण्यात आले असून त्याची किंमत अंदाजे १५.२४ लाख आहे.
विविध प्रकरणांत मिळून ₹१.१३ कोटींचे परकीय चलन देखील जप्त करण्यात आले आहे.
दरम्यान, कस्टम्स विभागाकडून विमानतळावर तस्करीविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात आली असून संबंधित प्रवाशांविरुद्ध एनडीपीएस व कस्टम्स कायद्यांतर्गत पुढील तपास सुरू आहे.
