शहापूरातील नामपाडा धरणाचा खर्च ६६ कोटी ३२ लाखांच्या घरात
प्रशासकीय मान्यतेसाठी सुधारीत प्रस्ताव सरकारला सादर
अविनाश उबाळे
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील नामपाडा धरणाचे काम सुरू झाले असून या धरणाचा सरकारी अंदाजपत्रकीय खर्च सुरुवातीला ९ कोटींवरून ३८ कोटींवर तर आता या प्रकल्पाचा खर्च तब्बल ६६ कोटी ३२ लाख रुपयांवर पोहोचला आहे.या नामपाडा धरणाच्या कामासाठी सुधारीत प्रशासकीय मान्यता व वाढीव निधी मिळावा यासाठी जलसंपदा विभागाने राज्य सरकारला प्रस्ताव सादर केला आहे.
शहापूरपासून ४० किलोमीटर अंतरावर किन्हवली जवळ नामपाडा नावाचा धरण प्रकल्प राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने २००९ सालापासून हाती घेतला आहे.संपूर्ण मातीचे काम असलेल्या या धरणाला केवळ स्थानिक शेतकर्यांच्या शेतीसाठी सिंचन म्हणून पाणी मिळावे यासाठी जलसंपदा विभागाने प्रशासकीय मान्यता दिली होती,परंतु सुरुवातीला कासव गतीने सुरू असलेले धरणाचे काम वर्षभरातच रखडून पडले.वन विभागाच्या परवानग्या अपूर्ण राहिल्याने वन विभागाने धरणाचे काम बंद पाडले होते.आजमितीस या धरणाचे फक्त ४० टक्केच काम पूर्ण झाल्याचे दिसत आहे.या धरणाची पाणी साठवण क्षमता एकूण ३ हजार ५३३ दशलक्ष घनमीटर इतकी आहे.हे धरण पूर्ण झाल्यास धरणाच्या डाव्या कालव्यातून २५५ हेक्टर क्षेत्रात सिंचन होणार आहे.सुरुवातीला केवळ ९ कोटी १५ लाख रुपये खर्च अपेक्षित असलेल्या नामपाडा धरण प्रकल्पाचा खर्च ३८ कोटी ९८ लाख त्यानंतर सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार आता तब्बल ६६ कोटी ३२ लाखांच्या घरात नामपाडा धरण प्रकल्पाचा खर्च पोहोचला आहे.आजमितीला या धरण प्रकल्पासाठी १७ कोटी ७२ लाख रुपये एवढा खर्च करण्यात आला असून गेल्या १७ वर्षांपासून रखडलेल्या या बहुचर्चित नामपाडा प्रकल्पाला राज्य सरकारने पुन्हा एकदा हिरवा कंदील दाखवला आहे.सध्यास्थितीला धरण प्रकल्पाचे काम जलसंपदा विभागाच्या पाटबंधारे बांधकाम विभागाकडून युध्दपातळीवर सुरु आहे.नामपाडा धरण प्रकल्प पुर्ण झाल्यानंतर या धरणातून शहापूर तालुक्यातील किन्हवली जवळील सावरोली,कानडी,नांदगाव,खरीवली,आपटे या गावांसह वेलकड़ी,गांगणवाडी,वडाची वाडी,हिरव्याची वाडी,नामपाडा,टाकीची वाडी,मधली वाडी,रिकाम वाडी,उंबरवाडी,डोंगरी,कातकर वाडी या आदिवासी पाड्यांवरील शेतकऱ्यांना बारमाही शेतीसाठी सिंचन म्हणून पाणी उपलब्ध होणार आहे.असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात येत आहे.यंदा मे महिन्याच्या अखेरीस धरणाच्या मुख्य बांधावरी मातीचा भराव करणे व तलावाच्या बाजूकडीलदगडी पिंचिगचे काम पुर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे या प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता अ.सु.शहाणे यांनी माहिती देताना सांगितले.
