महाराष्ट्र केसरी निवड चाचणी
श्री गणेश आखाड्याच्या ४ पैलवानांचा दिमाखदार विजय
१८ फेब्रुवारी रोजी भिवंडी तालुक्यातील सरवली येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने व ठाणे जिल्हा कुस्ती तालीम संघ आयोजित महाराष्ट्र केसरी व प्रौढ अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी निवड चाचणी पार पडली. या स्पर्धेत मिरा भाईंदर महानगरपालिकाच्या सौजन्याने मिरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाडा येथील चार पैलवानांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकाविला.
७४ किलो माती विभागात पै. गणेश शिंदे याने अंतिम लढतीत मंथन पाटील (कोनगाव) याच्यावर १२-०२ अशा गुणांनी मात केली. ७९ किलो गादी विभागात पै. सूरज माने याने प्रणय पाटील (जुनांदुरखी) विरुद्ध एकतर्फी सामना खेळत १० गुणांच्या फरकाने विजय संपादन केला. ८६ किलो गादी विभागात पै. सूर्यकांत देसाई याने निखिल पाटील याच्यावर १०-० अशी मात करत आपले वर्चस्व सिद्ध केले. तर ९२ किलो गादी विभागात पै. विशाल जाधव याने रोशन कराळे (कोनगाव) विरुद्ध १०-० अशा गुणांनी विजय मिळवत दावेदारी ठाम केली.
वरील चारही पैलवानांनी प्रतिस्पर्ध्यांवर १० गुणांच्या फरकाने, म्हणजेच तांत्रिक चीतपटिने विजय मिळवत १८ ते २२ मार्चदरम्यान वाघोली, जि. पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धासाठी आपली निवड निश्चित केली. या यशामागे आखाड्याचे सर्वेसर्वा श्री. वसंतराव पाटील तसेच कुस्ती प्रशिक्षक पै. वैभव माने यांचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या सर्व पैलवानांचे अभिनंदन करण्यात येत असून आगामी स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *