मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांनी आपल्या ॲक्सिस बँकेतील २३ वर्षांच्या नोकरीचा राजीनामा दिल्याचे वृत्त आज प्रसारित झाले आहे. ॲक्सिस बँकेत द्या वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. त्या पदाचा त्यांनी राजीनामा दिला आहे.
अमृता फडणवीस या देवेंद्र फडणवीस २०१४ मध्ये मुख्यमंत्री झाल्यापासून कायमच माध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनलेल्या आहेत. तसा विचार केल्यास त्यांचे देवेंद्रजींशी लग्न २००६ मध्ये झाले. तेव्हापासून तर २०१४ पर्यंत त्या कधीच फारशा चर्चेत नव्हत्या. एरवीच कोणत्याही राजकीय नेत्याच्या कुटुंबातील व्यक्ती या माध्यमांसाठी चर्चेचा विषय असतात, तर जनसामान्यांसाठी त्या कुतूहलाचा विषय असतात. त्याप्रमाणे अमृता फडणवीस यादेखील चर्चेचा आणि कुतूहलाचाच विषय राहिल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या पत्नी म्हणून तर त्या कायम कुत्वालाच्या विषय राहणारच होत्या. पण त्याचबरोबर त्यांच्या बिनधास्त स्वभावामुळे त्या जास्त चर्चेत राहिल्या. तसा विचार करता आतापर्यंत महाराष्ट्रात जे कोणी मुख्यमंत्री झाले, त्यांच्या पत्नी कुठे नोकरीत असल्याचे कानावर नव्हते. मात्र अमृता फडणवीस या नव्या पिढीच्या प्रतिनिधी आहेत. त्यांचे लग्न झाले तेव्हा देखील त्या ॲक्सिस बँकेत नोकरीला होत्याच. त्यांचे लग्न ठरण्यापूर्वी अमृताजी आणि देवेंद्रजी एकमेकांना भेटले तेव्हा आपण एकमेकांना पैसे मागायचे नाहीत असे देवेंद्रजींनी त्यांना स्पष्ट केले होते, हे मुख्यमंत्री झाल्यावरच देवेंद्रजींनी माध्यमांना सांगितले होते. मात्र २०१५ मध्ये नांदेडच्या दैनिक श्रमिक एकजूटच्या दिवाळी अंकात “मी गौरीहार पूजिला आव्हानांचा” या शीर्षकाखाली मी अमृताजींची मुलाखत घेतली तेव्हा त्यांनी देवेंद्रजींचे हे विधान अर्धसत्य असल्याचे नमूद केले होते. घर चालवायला मी तुला पैसे देणार नाही मात्र गरज पडल्यास तुला पैसे मागील असे देवेंद्रजी म्हणाले होते हे देखील त्यांनी खाजगीत मला सांगितले होते. माझ्या आठवणीनुसार २०१५ किंवा १६ मध्ये झी टीव्हीवरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांचा सहभाग होता. त्यावेळी या कार्यक्रमात एका अँकरने तुम्ही नोकरी करता हेच बरे आहे कारण या राजकारण्यांचे काही खरे नसते त्यामुळे काही कमी जास्त झाले तरी तुमची नोकरी आहे घर चालवायला प्रॉब्लेम येणार नाही अशी खोचख टिप्पणी केली होती.
अमृताजी फक्त त्यांच्या ॲक्सिस बँकेतील नोकरीमुळेच चर्चेत राहिल्या असे नाही, तर त्यांचे संगीत प्रेम हे देखील चर्चेचा विषय ठरले होते. त्यांचे माहेर नागपूरचे रानडे कुटुंब त्यांचे वडील डॉ. रानडे हे देखील संगीतप्रेमी आहेत. आज वयाच्या पंचाहत्तरी नंतरही ते संगीतसाधना करत असतात. त्यामुळे अमृताची सुद्धा संगीत साधना करत आहेत. देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यावर काही चित्रपटांना त्यांनी पार्श्वसंगीत सुद्धा दिले आहे. नुकतेच युट्यूब वर शिवशंभू हे त्यांनी गायलेले गीत आणि सोबत त्यांचा व्हिडिओ हा प्रसारित झाला असून त्याला काही लाख व्ह्युज सुद्धा मिळाल्याची बातमी होती. त्यामुळे त्यांच्या संगीतप्रेमासाठी आणि साधनेसाठी सुद्धा त्या कायम चर्चेत राहिलेल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर अमृता फडणवीस या सर्वप्रथम चर्चेत आल्या त्या त्यांच्या पतीच्या मुख्यमंत्रीपदाचा लाभ न घेण्याच्या मानसिकतेमुळे. त्यावेळी त्यांची नोकरी नागपुरातच सुरू होती.
त्यांना लक्षात आले की आपल्या ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपते आहे. त्यासाठी मग त्या नागपूरच्या आरटीओ कार्यालयात गेल्या. शांतपणे लाईनीत उभ्या राहिल्या आणि आपले लायसन्स रिन्यू करून घेतले. यावेळी खिडकीतल्या कारकूनाने त्यांच्या कार्डावर अमृता देवेंद्र फडणवीस हे नाव पाहीले त्यावेळी तो हादरला. त्याने लगेच वरिष्ठांना जाऊन सांगितले आणि मग वरिष्ठ धावत आले. तोवर अर्ज दाखल करून अमृताजी आपल्या गाडीकडे निघालेल्या होत्या.
याशिवाय आधी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या बिनधास्त वागण्या बोलण्यासाठी देखील त्या कायम चर्चेच्या विषय राहिल्या आहेत. त्या आधुनिक काळातील सुशिक्षित तरुणी असल्यामुळे त्यांची राहणी देखील अत्यंत आधुनिक अशीच राहिली आहे. परिणामी त्यावर देखील चर्चा होते तशीच टीकाटीपणी सुद्धा होते. मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून त्यांनी विविध माध्यमांना ज्या मुलाखती दिल्या त्यामुळे देखील त्या चर्चेच्या विषय बनल्या होत्या. २०१९ मध्ये जेव्हा उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत असलेली युती तोडत राष्ट्रवादी काँग्रेसशी हात मिळवणी केली तेव्हा आणि त्यानंतर देखील अमृताजींची माध्यमांशी बोलताना केलेली काही विधाने जशी चर्चेचा विषय बनली होती, तशी टिकेचा देखील विषय बनली होती. एकदा देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना एका जहाजातून फेरफटका मारताना त्या क्रुझ वर जाऊन बसल्या आणि तो फोटो माध्यमांनी प्रसारित केला. त्यावर खूप टीकेचे वार झाले होते. शिवसेनेचे तत्कालीन एक वैदर्भीय नेते किशोर तिवारी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना पत्र लिहून अमृताजींना तुम्ही आवरा अशी विनंती देखील केली होती. मात्र जनसामान्यांनी हा किशोर तिवारींचा आगाऊपणा आहे म्हणून त्याकडे दुर्लक्षही केले.
अशा एकूणच चर्चेत राहिलेल्या अमृता फडणवीस यांनी आपली २३ वर्षाची ॲक्सिस बँकेतील नोकरी सोडून दिली आहे. आता नोकरी सोडून त्या काय करणार यावर देखील माध्यमांमध्ये चर्चा होईल. मात्र नोकरीत असतानाच अमृताजी समाजसेवेत सक्रिय होत्याच. त्यामुळे आता त्या अधिक जोमाने समाजसेवेत सक्रिय होतील यात शंका नाही. त्याचबरोबर त्या आता कुटुंबाकडे देखील जास्त लक्ष देऊ शकतील. आतापर्यंत त्यांचे घर सांभाळायला त्यांच्या सासुबाई श्रीमती सरिता फडणवीस या होत्या. सरिताताई आताही आहेतच, पण वयापरत्वे त्या बऱ्याच थकल्या आहेत. त्याचबरोबर त्यांची मुलगी दिवीजा ही देखील आता मोठी होते आहे. त्यामुळे त्यांनी आता कुटुंबासाठी वेळ देणे देखील गरजेचे आहे.
एकूणच समाजसेवा संगीतसाधना आणि कुटुंबाकडे लक्ष देणे या तीन कामांसाठी त्यांनी नोकरी सोडली असणार असा निष्कर्ष काढायला काही हरकत नाही. त्याचबरोबर आता त्यांचे पद रिक्त झाल्यामुळे नव्या एका होतकरू व्यक्तीला ॲक्सिस बँकेत जागा होणार आहे. तसा विचार करता आता त्यांना नोकरीची फारशी गरज उरलेली नाही. त्यामुळे त्यांनी स्वतःहून नोकरीचा राजीनामा देऊन एका गरजू होतकरू व्यक्ती साठी जागा रिकामी करून दिली, ही बाब स्वागतार्हच आहे.
त्याचबरोबर आता अमृता फडणवीस यादेखील राजकारणात सक्रिय होतील अशा अटकळी बांधायला सुरुवात होईलही. मात्र त्या राजकारणात येतील असे चिन्ह आज तरी दिसत नाही. तशाही त्या अत्यंत स्पष्टक्त्त्या आहेत. त्यांच्या स्पष्टवक्तेपणाचा अनुभव अनेकदा त्यांच्या मुलाखतीतून येतो. एकदा एबीपी माझाच्या मुलाखतीतच त्यांनी मी कोणाच्या बापाला घाबरत नाही असे विधान केले होते. त्यावरून चर्चाही बरीच रंगली होती. त्यांचा एकूण स्वभाव बघता त्या राजकारणात येतील आणि रमतील असे वाटत नाही.
अर्थात त्यांनी नोकरी सोडण्याची कारणे काहीही असोत, मात्र त्यामुळे आता एका होतकरू व्यक्तीसाठी जागा रिक्त होणार आहे, आणि त्याचबरोबर अमृताजी आता समाजकारण आणि संगीतसाधनेत सक्रिय होतील अशी आशा करायला काहीच हरकत नाही. त्यामुळे आपण सर्वांनीच त्याचे स्वागत करायला हवे, असे सहज सुचले म्हणून सांगावेसे वाटते
अविनाश पाठक
