आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये मध्य रेल्वेची प्रवासी वाहतूक १३७३ दशलक्षांच्या पार
मुंबई : मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष २०२५-२६ (जानेवारी २०२६ पर्यंत) प्रवासी वाहतुकीत उल्लेखनीय वाढ नोंदवली असून उपनगरीय आणि गैर-उपनगरीय दोन्ही विभागांत स्थिर प्रगती साधली आहे. या कालावधीत एकूण १३७३.३९ दशलक्ष प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. गेल्या वर्षीच्या याच कालावधीत ही संख्या १३४८.३३ दशलक्ष होती. यंदा प्रवासी संख्येत १.८६ टक्क्यांची वाढ झाली आहे.
आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उपनगरीय गाड्यांमधून १२०१.९३ दशलक्ष प्रवाशांनी प्रवास केला, तर मागील वर्षी ही संख्या ११८७.९२ दशलक्ष होती. मेल, एक्सप्रेस, पॅसेंजर आणि इतर गैर-उपनगरीय गाड्यांमधून १७१.४६ दशलक्ष प्रवाशांनी प्रवास केला असून गेल्या वर्षी ही संख्या १६०.४१ दशलक्ष इतकी होती. जानेवारी २०२६ या महिन्यात मध्य रेल्वेतून एकूण १४६.२९ दशलक्ष प्रवाशांनी प्रवास केला. त्यापैकी १२९.०८ दशलक्ष प्रवासी उपनगरीय गाड्यांमधून, तर १७.२० दशलक्ष प्रवासी गैर-उपनगरीय गाड्यांमधून प्रवास करणारे होते.
नेरुळ/बेलापूर-उरण विभागात अतिरिक्त सेवा सुरू करण्यात आल्या असून तरघर आणि गव्हाण ही दोन नवीन स्थानके कार्यान्वित झाल्याने उपनगरीय प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकल सेवा सुरू केल्यानंतर अवघ्या १६ दिवसांत ६ लाखांहून अधिक प्रवाशांनी या सेवांचा लाभ घेतला आहे. यावरून प्रवाशांचा आरामदायी व कार्यक्षम सेवांकडे वाढता कल स्पष्ट झाला आहे.
सध्या मध्य रेल्वे मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या प्रवासाच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी ९४ वातानुकूलित लोकल सेवांसह एकूण १८२० उपनगरीय सेवा चालवत आहे. सुरक्षित, आरामदायी, किफायतशीर, विश्वासार्ह आणि कार्यक्षम वाहतूक सुविधा देण्यासाठी मध्य रेल्वे कटिबद्ध असून वाढत्या प्रवासी अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी सेवा अधिक सक्षम करण्यावर भर देत आहे.
