झिरवाळांच्या लाचखोर लिपिकाला जामीन मंजूर

मुंबई अन्न व औषध प्रशासन विभागातील लाचखोरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या लिपिक राजू (राजेंद्र) ढेरिंगे याला मुंबई सत्र न्यायालयातील एसीबीच्या विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायालयीन कोठडीत रवानगी होताच त्याच्या जामिनावर सुनावणी घेण्यात आली आणि त्याला दिलासा मिळाला.

मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एसीबी कोर्टाने ढेरिंगे याचा जामीन अर्ज मंजूर केला. दरम्यान, एसीबीने त्याला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले होते. न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर लगेचच जामीन अर्जावर सुनावणी झाली.

लाच प्रकरणाची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी संबंधित लिपिकाविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. केवळ चौकशीच नव्हे तर त्याची प्रतिनियुक्ती रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विभागातील दक्षता पथकाला सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले असून, वस्तुनिष्ठ व सर्वंकष अहवाल तातडीने सादर करण्यास सांगितले आहे.

दरम्यान, एसीबीने ढेरिंगे याच्या नाशिक रोड येथील घराची काही दिवसांपूर्वी झडती घेतली होती. या झडतीत काही महत्त्वाची कागदपत्रे हाती लागल्याची माहिती आहे. ढेरिंगे हा मूळचा अन्न व नागरी पुरवठा विभागातील कर्मचारी असून, वर्षभरापूर्वी तो अन्न व औषध प्रशासन विभागात प्रतिनियुक्तीवर आला होता. तो मंत्र्यांच्या अपील विभागात कार्यरत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *