ठाणे महापालिकेची पहिलीच सर्वसाधारण सभा तहकूब
सिद्धेश शिगवण
ठाणे : ठाणे महापालिका निवडणूकीत नगरसेवक निवडणून आल्यानंतर आणि महापौर विराजमान झाल्यावर पहिलीच सर्वसाधारण सभा शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. मात्र ही सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली. अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ठाणे महापालिकेची पहिलीच सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आल्याचे अधिकृत सांगण्यात आले. यावेळी सर्व पक्षाचे गटनेते, ज्येष्ठ नगरसेवकांनी अजित पवार यांना आदरांजली वाहत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी शिवसेना शिंदे गटाचे महापालिकेतील गटनेते पवन कदम यांनी अजित पवार यांच्या निधनाची घटना मनाला चटका लावून गेल्याचे म्हटले. तर, भाजपचे गटनेते मुकेश मोकाशी यांनीही अजित पवार यांच्या कार्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे गटनेते नजीब मुल्ला यांनी अजित पवार यांच्यासोबतचे अनेक किस्से मांडले. अजित पवार यांच्यासोबतची त्यांची शेवटची भेट कशी झाली, अजित पवार यांचे मिळालेले मार्गदर्शन, सकाळी उठून काम करण्याची त्यांची सवय याविषयी नजीब मुल्ला हे भाषण करताना भावूक झाले होते.तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अश्रफ शानू पठान यांनी अजित पवार यांच्या अपघातात कोणी दोषी आहे? अपघात कसा झाला? याची चौकशी करण्याचे आमचे निवेदन महापौरांनी सरकारला द्यावे अशी मागणी केली. तर एमआयएम पक्षाच्या नगरसेवकांनीही आम्ही अजित पवार यांच्या कुटुंबासोबत असून प्रकरणाचा तपास व्हावा अशी मागणी केली. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक विकास रेपाळे, राम रेपाळे यांनीही अजित पवार यांच्यासोबत निवडणूकांमध्ये काम करताना आलेले अनुभव सांगितले. तसेच अनेक ज्येष्ठ नगरसेवकांनी त्यांच्या भावना यावेळी व्यक्त केल्या. ही सभा अजित पवार यांना श्रद्धांजली देण्यासाठी तहकुब करण्यात आल्याचे सांगत लवकरच नवीन तारीख घोषित केली जाईल असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
