शिवजयंतीनिमित्त गुरुकुल कृती फाउंडेशन ट्रस्टचा सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमात सक्रिय सहभाग
मुंबई शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य पदयात्रा व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनात गुरुकुल कृती फाउंडेशन ट्रस्ट यांनी मोलाचा सहभाग नोंदविला. जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर व सांस्कृतिक कार्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या कार्यक्रमात गुरुकुल कृती फाउंडेशनचे संस्थापक  उमेश मूरकर तसेच त्यांच्या स्वयंसेवकांनी संपूर्ण कार्यक्रमात नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्थापन व समन्वयाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. पदयात्रा, सांस्कृतिक सादरीकरणे तसेच विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीत स्वयंसेवकांचा सक्रिय सहभाग लाभला.
सामाजिक जाणीव आणि सांस्कृतिक मूल्यांचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या गुरुकुल कृती फाउंडेशन ट्रस्टने शिवजयंतीच्या निमित्ताने तरुण पिढीमध्ये इतिहासाची जाणीव व समाजभान निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे यावेळी दिसून आले. या कार्यक्रमास पद्मश्री पुरस्कार विजेते उदय देशपांडे (मल्लखांब प्रशिक्षक), आंचल गोयल (जिल्हाधिकारी, मुंबई शहर), बप्पासाहेब थोरात (अपर जिल्हाधिकारी, मुंबई शहर) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथील प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी मार्क धरमाई, अनिल घुगे, फुलचंद कराड, नेहा साप्ते, समृद्धी देवळेकर, निलेश गराटे, साहिल उतेकर उपस्थित होते.
गुरुकुल कृती फाउंडेशन ट्रस्ट तर्फे आंतरराष्ट्रीय खेळाडू व रेफ्री विघ्नेश मूरकर यांच्यासह विन्स पाटील, आशिष महाडिक, अश्विनी जांभळे, भूपेश वैती, सय्यद मोहमद, श्रेयांक मौर्य, शिवांक मौर्य, अथर्व काळे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात मोलाचा सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे, नुकत्याच दिल्लीत पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत दुहेरी सुवर्णपदक पटकावणारे खेळाडू सिद्धत गुप्ता यांची उपस्थिती कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली.
गुरुकुल कृती फाउंडेशन ट्रस्टच्या स्वयंसेवकांनी पदयात्रा, मान्यवरांचे स्वागत, शिस्तबद्ध नियोजन व समन्वय यामध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली. शिवजयंतीच्या निमित्ताने सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात तरुणाईला प्रेरणा देण्याचे कार्य ट्रस्टच्या माध्यमातून घडल्याचे यावेळी दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *